प्रासंगिकसंपादकीय

जीवघेण्या कोरोनाने बदलले जीवनमान:लॉकडाऊनने काय शिकवले !

“खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे “

कोरोना या महामारीच्या संकटात सापडला फक्त मानव… ना ही कोणता धर्म, ना ही कोणती जात….
होळी आली आणि कोरोनाने बोंबाबोंब केली.
२२ मार्च रोजीचा जनता कर्फ्यु झाला आणि माननीय पंतप्रधान यांनी घेतला लाॉकडाऊन चा निर्णय!कारणही तसेच होते. संपूर्ण जगभरात कोरोना ने थैमान घातले होते. आणि तो आता आपल्या भारतात येऊन ठेपला होता. यावेळी लाॅकडाऊन चा निर्णय सर्वार्थाने योग्यच होता.
पण घराघरातले वातावरण बदलून गेले.घरातील माणसे चार भिंतीत बंद झाले.जणु काही “जग हे बंदीशाळा” असंच् घडले, ते पण अचानक. हो… हो.. म्हणजे लाॅकडाऊनच. तसा हा शब्द आमच्या साठी नविनच. आज हा शब्द लहानपणापासून थोरांपर्यंत, थोरांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या तोंडी बसला आहे.
लाॅकडाऊन १..२ करत करत आता चौथा आला आणि आता मात्र लोकांचा धीर सुटला.आता या लॉकडाऊनला लोक कंटाळले, वैतागले. कुणाला सक्ती वाटली तर कुणाला सजा. पण मला मात्र ह्या लाॅकडाऊन मध्ये खुप काही शिकायला मिळाले. आणि त्याबद्दल माझे विचार मी मांडित आहे.
नक्कीच जागतिक, सामाजिक पातळीवर खुप काही बदलले आहे. अर्थव्यवस्था ही पूर्णतः कोलमडून पडली. यामुळे खुप काही बदल आपण झेलत आहोत.
पण जेव्हा मी स्वत:च्या मनात डोकावून पाहिले तर माझ्यामध्ये प्रचंड बदल झाला आहे. मग मी अंतर्मुख होऊन विचार केला. आपलं आरोग्य, नात्यांची जपणुक, आपल्या गरजा, सामाजिक भान या गोष्टींबद्दल मन आपोआप समृद्ध होत गेले.
या काळात शिक्षणामुळे बाहेर असणारा माझा मुलगा घरी आला. रोज सकाळी उठून शाळेत जाणारी मुलगी घरीच, पती डॉक्टर असल्याने त्यांना इमरजन्सी सर्वीससाठी जावं लागतय.सासुबाई सासरे यांना तर बाहेर जायला आम्हीच बंदी घातली. हे सर्व बदल फक्त माझ्या आयुष्यातच नाही तर प्रत्येकाच्या घरी हीच कथा. त्यामुळे झाले काय की गृहीणींचे काम वाढले. त्यात भरीस भर म्हणून कामवाल्या मावशी येणं बंद झालं म्हणा किंवा आम्ही बंद केली म्हणा.
या सर्वांत एक गोष्ट छान झाली ती म्हणजे सर्व कुटुंब सोबत आहे हा आनंद. खुप दिवसांनी एकमेकांना वेळ देता आला. त्यावेळी लक्षात आले की कामाच्या धबडग्यात संवाद च हरवला आहे. मग ठरवलं की आता काही झाले तरी संवाद कमी होता कामा नये.
त्यासाठी सर्व गृहीणीला माहित असलेला सोपा मार्ग कोणता तर ‘सर्वात महत्वाचा मार्ग हा पोटातून जातो’ हे पक्के माहीत आहे. आता रोज सुरू झाले स्वयंपाकघरात नवनवीन प्रयोग. घरातील इतर कामे करत सर्वांच्या फर्माईश पूर्ण करताना जाणवलं की खरंच माझ्यातील सुगरणीला मी कुलुपबंद करून ठेवले होते. गेल्या कित्येक वर्षात मी ना केक घरी बनवला ना मुलांना आवडेल असे चमचमीत पदार्थ. मिळतंय आयत हाॅटेल मध्ये तर कशाला घरी करायचा…. पण जेव्हा मी असे पदार्थ घरी योग्य प्रमाणात,स्वच्छ वातावरणात बनविले तेव्हा जाणीव झाली की आपण घरी बनवू शकतो तर हाॅटेलचा खर्च कशाला!!! तो ही अनावश्यक.
अर्थात माझ्यातील सुगरण या लाॅकडाऊनमुळे कायमची जागी झाली होती हे विशेष!!
या काळात माझ्या सारख्या सगळ्या गृहिणी घरी वेगवेगळे पदार्थ करून बघत होत्या. त्यादरम्यान मी माझी बरीच जपून ठेवलेली पुस्तकें वाचायला काढली. पाककलेची आवड असल्याने खुप छान पुस्तके पुन्हा वाचनात आली. खजानाच होता तो.
मग मी विचार केला, सध्या मोबाईल युग आहे. पुस्तके फारसं कुणी वाचत नाही. आपण जर WhatsApp group बनवला तर…..

तशी मी कायम मैत्रिणींसोबत रममाण होणारी, सामाजिक भान ठेवनारी, समाजात मिसळणारी…..लाॅकडाऊन मध्ये कुणाला भेटताही येत नाही. या काळात माझं कसं होणार ही चिंता आधीच मला सतावत होती.
आतापर्यंत वेळ घालवण्यासाठी WhatsApp वापरणारी मी… एक गृप बनवला..” सुगरणीचा सल्ला” उद्देश हाच की आपल्या अनुभवाचा फायदा सगळ्यांना होऊ शकतो आणि दुसर्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला. सगळ्या आपल्या पाककलेतील कौशल्य घरी दाखवत आहेत, मग त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले… आणि बघता बघता गृप फुल तर झालाच पण प्रतिसादही खूप छान मिळाला. नवनवीन रेसिपी सोबतच हे ही शिकता आले की दुर राहुन पण आपण जोडलेले राहू शकतोय…. नाही का!!
आपण आणि आपले मुल़ं जंकफूड शिवाय नक्कीच राहू शकतोय. घरच्या घरी आपण हाॅटेल सारखे पदार्थ बनवू शकतो आणि तेही कमी खर्चात मनसोक्त भरपूर. ही शिकवण तर आयुष्यभर लक्षात राहील.

" देह देवाचे मंदिर, आत* *आत्मा आहे परमेश्वर* " या उक्तीप्रमाणे देहाची म्हणजेच शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व मला शिकता आले. खरं तर जगातील लोकांपेक्षा भारतीय लोकांची प्रतिकारशक्ती खुप चांगली आहे.

माझे पती Health Concious, त्यामानाने मी थोडी दुर्लक्ष करणारी. पण या काळात माझ्या पतीने मला व मुलांना प्राणायाम, व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून रोज संध्याकाळी आम्हाला वेळ दिला. व्यायाम करण्यासाठी जीम मध्येच् जावं लागतं ही माझी ठाम समजूत. पण घरी सुद्धा आपण योग्य रीतीने व्यायाम करु शकतो आणि तब्येतीची काळजी घेऊ शकतो. रोज बातम्या बघून वाचून लक्षात आले की कोणत्याही पुजारी, मौलवी, धर्मगुरू,पाद्री, ज्योतिषी यांच्या मध्ये एकाही कोरोना रुग्णांना वाचवण्याची ताकद नाही.जिथे
लाॅकडाऊनमध्ये सगळ्या देवांची दारं बंद झाले तिथे सामान्यांची काय बिषाद. पण आपण मनापासून प्रार्थना केली तर जाणवतं की अरे देव तर आपल्यात आहे.कबिराच्या म्हणन्या प्रमाणे मोको कहाँ ढूंढे रे बन्दे मैं तो तेरे पास देव् कुठे आहे आपल्या आजूबाजूला असणा-या व्यक्तींमध्ये आहे. देव हा फक्त मंदिरात नसुन ह्या चिरकाल देहात आहे.
या काळात कोरोना फायटर्स चे म्हणजेच डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी,पोलीस, सफाई कर्मचारी यांच्यात देव् आहे म्हणूनच आपल्या जीवनात यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हे अधोरेखित झाले.
तसं बघायला गेलं तर या निसर्गाच्या सान्निध्यात सुद्धा देव आहे. या लाॅकडाऊनच्या काळात पशु पक्षी यांना वाटलं असेल की हे जग त्यांचे देखील आहे. माणसं घरात कैद झाले आणि त्यांचा मुक्त संचार सुरू झाला. आकाशात तारे चमकतात, आपल्या आजूबाजूला सुंदर हिरवीगार झाडे आहेत, रंगीबेरंगी फुले फुलतात हे बर्याच मुलांना पहिल्यांदा अनुभवायला मिळाले.
यातुनच आपल्याला शिकवण मिळते की निसर्ग जपा. मानवाला मिळालेले देहरुपी मंदिर जपा.
हे निसर्गाचे चक्र बिघडण्यास मानव च् कारणीभूत आहे *.

“मानवा… आता तरी सुधार
स्वार्थाला आवर. ही पृथ्वी तुझ्या एकट्याची नाही हे *सत्य *स्विकार!!”

गेल्या ४ लाॅकडाऊन मध्ये खुप बघायला, शिकायला मिळाले. आपल्या गरजा खुप सिमित आहे. पण चढाओढीच्या नादात आपली विनाकारण होणारी खरेदी थांबली. सोने, जडजवाहीर यांची खरेदी थांबली पण तरीही आपण जगतोय.तेही आनंदाने.
जगाला हे ही शिकता आले की पैसे आपल्याला वाटते तेवढे महत्त्वाचे नाही. कारण आपण भाजी भाकरी शिवाय जगू शकत नाही. शेतकरी राजा हाच खरा राजा आहे.शेतकरी हे च खरे नायक आहेत, खरेखुरे स्टार.. चित्रपट तारे, क्रिकेटपटू हे फक्त आपले मनोरंजन करु शकतात. ते नसले तरी चालेल. पण शेतकरी राजा नसेल तर…. विचार ही करवत नाही. कारण आपण मोबाईल, इंटरनेट, डबाबंद पदार्थ,चकचकीत कार, माॅल हे सर्व वरवर चे भौतिक जग याने पोट भरणार नाही. जगण्यासाठी आवश्यक आहे दुध, भाजी, भाकरी, स्वच्छ पाणी…
लाॅकडाऊन सोबतच काही नवीन शब्द आपल्या आयुष्यात आले …..ते म्हणजे सोशल डिस्टसींग, आयसोलेशन, सॅनिटाईझींग. याविषयी सरकारकडून वेळोवेळी मार्गदर्शन व योग्य माहिती मिळाली. आता तर ते आपल्या अंगवळणी पडले आहे. लोकांमध्ये शिस्तीचं प्रमाण वाढलंय.स्वावलंबन, काटकसर, सिमित गरजा, आत्मनिर्भरता , अनुशासन ही जरी लाॅकडाऊनची शिकवण असली तरी…..हे सर्व आपल्याला दिर्घकाळ नकोय!!
आता लाॅकडाऊन हा शब्द विसरुन आपण योग्य रीतीने काळजी घ्यावी. सोशल डिस्टसींग म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी योग्य अंतर ही कायमची सवय बनवावी. मास्क पण रोज लावायचाच.
खुप शिकायला मिळाले याकाळात…. म्हणूनच देवाला प्रार्थना आहे माझी..
नको देवरायाअंतआता पाहू*
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे”_

यावेळेस मला गुलजार यांनी लिहिलेल्या काही ओळी सार्थ वाटतात
जिंदगी में पहली बार ऐसा वक्त आया, इंसान ने जिंदा रहने के लिये कमाना छोड दिया |
घर गुलजार, सूने शहर
बस्ती बस्ती में कैद हर हस्ती हो गयी, आज फिर जिंदगी महंगी और दौलत सस्ती हो गयी | “

माझ्या बंधू आणि भगिनींनो, सुखाचा सुर्य नक्की उगवेल, तो आम्हाला पाहवयाचा आहे तर लाॅकडाऊनमधील मौल्यवान शिकवण घेऊन घरी राहूया.
घरी रहा, सुरक्षित रहा,उद्याच्या आनंदासाठी आज थोडं सोसु या.करोनाला हरवू या!!

सौ. दिपाली विवेक दुसाने,
श्रीनिवास, भाग्यनगर,
बीड. ४३११२२
९४२२९३३३६६