ऑनलाइन वृत्तसेवा

रेमडेसिवीर इंजेक्शनची खरी गरज कुणाला!तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

करोना प्रतिबंधासाठी वैद्यकीय उपचारांमध्ये वापरात येणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांची धावाधाव सुरू आहे. मात्र या इंजेक्शनची गरज करोना झालेल्या प्रत्येक रुग्णाला नसते. त्यामुळे विनाकारण अस्वस्थ होऊ नका. डॉक्टरांना त्यांच्या वैद्यकीय उपचारांची दिशा ठरवू द्या, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.


केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी पहिल्या दहा दिवसांमध्ये हे इंजेक्शन फायदेशीर ठरते, असे सांगितले. रुग्णाच्या लक्षणांची तीव्रता किती आहे यावर या विषाणू संसर्गाचा जोर कमी करणाऱ्या या इंजेक्शनची परिणामकारकता ठरते. टास्क फोर्सने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या इंजेक्शनचा वापर केला तर ज्यांना खरच गरज आहे, त्यांनाही हे औषध योग्यवेळी वापरता येईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.


फार्मासिस्ट असोसिएशनचे कैलास तांदळे यांनी अनेकजण सातत्याने इंजेक्शसंदर्भात विचारणा करतात. रुग्णांना इंजेक्शन मिळायला हवे, तरीही इतर पर्यायांच्या संदर्भात डॉक्टरांशी चर्चा करायला हवी. कोविड झाल्यानंतर उपचार घेत असलेल्या एन. एस. रामेश्वर यांनी एचआरसीटी स्कोअर नऊ असला तरीही रेमडेसिवीर इंजेक्शन न घेताही करोनामुक्त झालो, हा अनुभव आवर्जून सांगितला.
डॉक्टरांकडून निरीक्षण केल्यानंतर इंजेक्शन घ्यायचे की नाही हा निर्णय घेतला जातो. संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञ डॉ. किर्ती सबनीस यांनीही वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला रेमडेसिवीर दिले जात नाही, असे सांगितले. इतर व्हायरल तापांप्रमाणे सौम्य स्वरूपाच्या लक्षणे असलेल्या करोनाच्या लक्षणांवर व्यवस्थित लक्ष ठेवून घरीही उपचार घेता येतात. इंजेक्शन मिळाले नाही तर हा विचाराने लोक व्यथित होतात. तसे होण्याचे कारण नाही. हे इंजेक्शन संसर्गाच्या कोणत्या टप्प्यात, कोणते आजार असलेल्या रुग्णांना द्यावे हे डॉक्टर ठरवतात. अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होतानाच रेमडेसिवीर द्या, असा आग्रह धरतात. मात्र त्यात वैद्यकीय तथ्य नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.(साभार-म टा)