ऑनलाइन वृत्तसेवादेशनवी दिल्ली

कठीण प्रसंगातही काहींचे राजकारण सुरू आहे-पंतप्रधान मोदींनी सुनावले

नवी दिल्लीः देशातील करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पंतप्रधान मोदींनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना केल्या. करोनावरील लसीकरणावर आज जी चर्चा होते त्यापेक्षा अधिक आपल्याला चाचण्यांवर भर देण्याची गरज आहे, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय.


देशात सध्या संपूर्ण लॉकडाउनची गरज नाहीए. औषधांसह प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंधांचीही गरज आहे. रात्रीची संचारबंदी ही प्रभावी ठरत आहे. करोना संचारबंदी म्हणून ती लागू केली पाहिजे. यामुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढेल. आपल्याकडे यंत्रणेसोबतच अनुभवही आहे, याचा पूर्ण उपयोग करूया, असं आवाहन मोदींनी केलं.


लसीकरणासह करोनाच्या टेस्टींग वाढवण्यावर अधिक भर दिला पाहिजे. आपण टेस्टींग विसरून आपण लसीकरणावर गेले आहोत. आपण करोनावरील आधीची लढाई फक्त टेस्टींगने जिंकली होती. त्यावेळी लसही नव्हती. यामुळे करोनाच्या टेस्टींगवर भर द्यावा लागेल. करोना हा संसर्ग आहे. बाहेरून तुम्ही आणत नाही तोपर्यंत तो येत नाही. यामुळे टेस्टींग आणि स्ट्रेसिंग वाढवण्याची गरज आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.


टेस्टींग वाढल्याने संसर्गाचे रुग्ण वाढतील. रुग्णसंख्या वाढल्याने टीका होईल. पण त्याकडे दुर्लक्ष करा. आधीही भरपूर टीका झाली आहे. स्वॅब नमुने घेताना काळजी घ्या. तोंड आणि नाकाच्या आतून नमुने घेतले पाहिजे. नमुने योग्य प्रकारे घेण्याची गरज आहे. आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्याची गरज आहे. आपले टार्गेट हे ७० टक्के आरटीपीसीआर टेस्ट असायला हवे, असं आवाहन मोदींनी मुख्यमंत्र्यांना केलं.
महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट पिकवर आहे. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा एकदा युद्ध पातळीवर काम करण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.


आपण गेल्या वेळी करोनाला नियंत्रित केलं. तसंच काम आताही करायचं आहे. टेस्टींगव लक्ष केंद्री केले पाहिजे. कारण लसीकरणाची प्रक्रिया ही दीर्घकाळ चालणार आहे. मला अतिशय कठीण काळात देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी खुशाल करावं आणि ते करतही आहेत. पण ही लढाई आपण जिंकणार याचा मला पूर्ण विश्वास आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणच दिसत नाहीए. यामुळे अनेक कुटुंबांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव होत आहे. लस घेतल्यानंतरही कुठलाच निष्काळजीपणा नको आहे. मास्क लावण्यासह सर्व काळजी घेणं गरजेचं आहे.