महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढ नोंदवली जात आहे. अशातच पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दि.8 ते 10 एप्रिलदरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सध्या देशाच्या पूर्वेकडून उत्तरेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचबरोबर झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांवर हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. वातावरणाची ही स्थिती बंगालच्या उपसागरातील बाष्प ओढून घेत असून, त्यामुळे या भागात ढग साचण्याचा अंदाज आहे. या स्थितीच्या प्रभाव राज्यातही काही प्रमाणात होणार आहे.
परिणामी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यात सर्वधिक तापमान अकोला येथे 42.9 अंश सेल्सिअस तर सर्वांत कमी तापमान पुण्यात 19.3 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले.