कोरोनाची लस घेतल्यानंतर या पाच गोष्टी करू नका:साइड इफेक्ट्सबाबत WHO चा अहवाल
जगभरात कोरोना विषाणूने पुन्हा उचल खाल्ली असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरणालाही वेग आला आहे. मात्र लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात शंका असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
कोरोनाची लस घेतल्यानंतर थोडे साइड इफेक्ट्स होणे सामान्य बाबत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. लस घेतल्यानंतर थोडासा ताप येणे, स्नायुंमध्ये वेदना होणे, डोकेदुखी सामान्य बाब आहे. यामुळे घाबरून जावू नसे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तसेच तुमचे शरीर कोरोना लसीला प्रतिसाद देत आहे हे याचे संकेत असल्याचेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने हे साइड इफेक्ट्स काही दिवसांनी कमी होऊन शरीर पूर्वव्रत होईल असे म्हटले असले तरी अनेक तज्ञांनी लस घेतलेल्या व्यक्तीने काही दिवस काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच लस घेतल्यानंतर कोणत्या गोष्टी करू नये याबाबतही माहिती दिली आहे. त्याबाबत जाणून घेऊया…
टॅटू काढू नये
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या मते, कोरोना लस घेतल्यानंतर शरीरावर काही दिवस टॅटू काढू नये. यामुळे रिअॅक्शन होण्याची शक्यता बळावते. अर्थात ही शक्यता कमी असली तरी लस घेताना याबाबत डॉक्टरांशी सल्लामसलत करणे योग्य.
सोबतच दुसरी लस घेऊ नये
कोरोनाची लस घेतल्यानंतर जवळपास दोन आठवडे अन्य कोणत्याही आजाराची लस घेऊ नये, असे तज्ञांनी म्हटले आहे. याबाबत अधिक संशोधन सुरू आहे, मात्र दोन लस घेताना काही आठवड्यांचा कालावधी असणे चांगले, असे तज्ञांनी म्हटले आहे.
व्यायाम टाळा
लस घेतल्यानंतर काही दिवस व्यायाम करणे टाळा. लस घेतल्यानंतर अनेकांना अंगदुखी, डोकेदुखीसारखे साइड इफेक्ट्स दिसले आहेत. तसेच स्नानूही दुखत असल्याच्या तक्रारी आल्याने काही दिवस व्यायामाला ब्रेक द्या.
शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका
कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. कारण पाणी प्रतिकारकशक्ती वाढवाऱ्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. तसेच लस घेतल्यानंतर ताप आल्यास यापासून सुटका होण्यासही शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे आवश्यक आहे.
सर्टिफिकेट जपून ठेवा
कोरोनाची लस घेतल्यानंतर मिळणारे सर्टिफिकेट जपून ठेवा. येणाऱ्या काळात प्रवास करण्यासाठी किंवा व्हिसा मिळवण्यासाठी याची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.