बी.एड. उत्तीर्ण उमेदवारही प्राथमिक शिक्षक
इयत्ता पहिली ते पाचवीला शिकविण्यासाठी पात्र ठरणार : औरंगाबाद खंडपीठ
औरंगाबाद– राज्यातील शाळांमधील इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविण्याआठी बी.एड. उत्तीर्ण उमेदवारांना पात्र ठरविण्यात येणार आहे. या उमेदवारांना नोकरीला लागल्यानंतर ब्रीज कोर्स पूर्ण करावा लागणार आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाल दिला आहे.
नगर येथील योगेश मैद यांनी खंडपीठात राज्य शालेय शिक्षण विभागाचे मुख्य सचिव व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती. शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी बी.एड. उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती. त्यावर अनेकदा सुनावणी झाली. नुकताच त्यावर न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे.
याचिकाकर्त्याच्या वतीने ऍड. सत्यजीत बोरा यांनी तर शासनाच्या वतीने ऍड. एस. बी. येवलेकर यांनी बाजू मांडली. एनसीटीईने इयत्ता पहिली ते पाचवीसाठी डी. एड. झालेले उमेदवार पात्र आणि त्यापुढील वर्गांसाठी बी. एड. उत्तीर्ण होणे आवश्यक केले होते. सन 2012 नंतर शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण बंधनकारक केले आहे. चालू शिक्षक भरतीत बी.एड. झालेल्यांना पहिली ते पाचवीसाठी घेण्यात यावे, अशी बाजू याचिकाकर्त्याच्या वतीने न्यायालयात मांडण्यात आली होती.
पवित्र भरतीला अडथळा
आता बी.एड.झालेल्या उमेदवारांना पहिली ते बारावीपर्यंत शिकवता येणार आहे. या आदेशाने डी.एड. झालेल्या उमेदवारांमध्ये नाराजी आहे. राज्य शासनाने फेरविचार याचिका दाखल करावी किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावे. या निकालामुळे पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीलाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती उमेदवारांच्या वतीने विठ्ठल सलगर यांनी दिली आहे.