देशनवी दिल्ली

कोविशील्ड लशीच्या दोन डोजमध्ये 6 ते 8 आठवड्यांचं अंतर

नवी दिल्ली, 22 मार्च : देशात पुन्हा एकदा वाढत्या कोरोना संसर्गादरम्यान लसीकरण अभियानाला गती आली आहे. यादरम्यान कोरोना लशीबाबत केंद्र सरकारच्या नवीन गाइडलाइन्सबाबत मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने लशीच्या दोन डोजमध्ये अंतर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या नव्या गाइडलाइन्सनुसार कोविशील्ड लशीच्या दोन डोजमध्ये आता 4 च्या ऐवजी 6 ते 8 आठवड्यांचं अंतर असेल.

देशात सुरू असलेल्या लसीकरण अभियानात 2 प्रकारच्या लशीचा वापर केला जात आहे. पहिली लस देशातील कंपनी भारत बायोटेकची कोवॅक्सीन (Covaxin) आणि दुसरी सीरम इन्स्टिट्यूट ( Serum Institute ) ऑफ इंडियाची (Covishield) कोविशील्ड.

यापैकी कोविशील्डबाबत केंद्र सरकारने नवीन निर्देश जारी केले आहेत. केंद्राच्या निर्देशानुसार कोविशील्डचा दुसरा डोज आता 4 आठवड्यांनंतर नव्हे तर 6 ते 8 आठवड्यांनंतर दिला जाईल.

कोवॅक्सीनवर निर्देश लागू नाहीत

कोवॅक्सीनवर केंद्राचे हे निर्देश लागू नसतील. म्हणजेच ज्यांनी कोवॅक्सीनचा पहिला डोज घेतला आहे, त्यांना दुसरा डोज 4 आठवड्यांनंतरही दिला जाईल. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार केवळ कोविशील्ड लशीच्या दोन डोजमध्ये 4 ते 6 आठवड्यांचं अंतर आवश्यक असेल. सध्या कोरोना लशीच्या दोन डोजमध्ये 4 आठवडे म्हणजेच 28 दिवसांचं अंतर आहे.

तज्ज्ञांच्या टीमने केलेल्या संशोधनानंतर घेतला निर्णय

मीडिया रिपोट्सनुसार लशीबाबत तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनुसार नॅशनल टेक्निकल एडव्हायजरी ग्रुप ऑन इम्यूनायजेशन (NTAGI) आणि लसीकरणाच्या तज्ज्ञ टीमच्या नव्या संशोधनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्देशांवर राज्य सरकारला अंमलबजावणी करावी लागेल. असा दावा केला जात आहे की, जर लशीचा दुसरा डोज 4 ऐवजी 6 वा 8 आठवड्यांमध्ये देण्यात आला तर जास्त प्रभावी असल्याचं दिसून येतं. या बाबात अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही.