राज्यात पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याच्या दृष्टीने शाळा व अंगणवाडींचे संलग्नीकरण
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याच्या दृष्टीने शाळा व अंगणवाडींचे संलग्नीकरण करण्यात येणार असून यात प्रामुख्याने अंगणवाडी केंद्रांचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
राज्यातील अंगणवाडी केंद्रांमार्फत 3 ते 6 वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात येते. वय वर्ष सहा पूर्ण झाल्यानंतर पहिल्या वर्गात शाळेत प्रवेश घेण्यासाठी अंगणवाडी केंद्रातील बालके शैक्षणिक दृष्ट्या परिपूर्ण नसल्याने ते प्राथमिक शिक्षणात मागे पडत असल्याचे दिसून येते. प्राथमिक शिक्षण विभाग व अंगणवाडी विभाग यांनी शिक्षणाच्या विषयावर एकत्रित येऊन काम केल्यास अंगणवाडी केंद्रातील बालकांना उत्कृष्ठ दर्जाचे पूर्व प्राथमिक शिक्षण देता येणार आहे.
राज्यात बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात किंवा शाळेजवळ अंगणवाड्या कार्यरत आहेत. एक शाळा-एक अंगणवाडी किंवा एक शाळा-दोन, तीन अंगणवाड्या या तत्त्वाचा वापर करून जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांचे सलंग्निकरण करावे लागणार आहे. राज्यातील 43 हजारांपेक्षा जास्त प्राथमिक शाळांच्या प्रांगणामध्ये अंगणवाड्या कार्यरत आहेत.
सुमारे 6 हजार अंगणवाड्या या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात कार्यरत आहेत. माहितीतीत सुसूत्रता आणण्यासाठी अंगणवाडी व शाळा यांचे मॅपिंग करण्यात यावे. यातून खरी आकडेवारी शासनास कळवावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बजाविले आहेत.
शाळेच्या प्रांगणात असणाऱ्या अंगणवाड्यांना शैक्षणिक सहाय्य, अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक मार्गदर्शन, प्रशिक्षण, आकार, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, शैक्षणिक पूरक अध्ययन साहित्य आदी समग्र शिक्षा अंतर्गत व जागतिक बॅंकेच्या स्टार्स प्रकल्पाअंतर्गत उपलब्ध करुन देता येईल. शालेय शिक्षण विभाग व महिला बालविकास विभागामधील अधिकाऱ्यांनी याची एकत्रित बैठक घेऊन कार्यवाही करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.