रुग्ण संख्या वाढली:औरंगाबाद मध्ये अंशतः लॉकडाऊन घोषित
औरंगाबाद-जिल्ह्यात येत्या ११ मार्च पासून ते ४ एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन राहणार आहे. तर प्रत्येक शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. शिवाय जाधववाडी, मंडी बुधवारपासून बंद राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच या कालावधीमध्ये रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नसल्याचेही चव्हाण म्हणाले.
या अंशतः लॉकडाऊनमध्ये धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, आंदोलन, सामाजिक कार्यक्रम, आठवडी बाजार, मॉल, जलतरण तलाव, क्रीडा मैदाने (मात्र सरावासाठी चालू असतील), शाळा, महाविद्यालये पूर्णतः बंद असतील.
यात महत्वाचे म्हणजे मंगल कार्यालय, सभागृह यात होणारे सर्व लग्न समारंभांना परवानगी नाकारण्यात आली आहे. शनिवार व रविवारच्या लॉकडाऊन दरम्यान वैद्यकीय सेवा, मीडिया ऑफिस, दूध विक्री, भाजीपाला, फळविक्री सुरू राहील.
१५ दिवसांनी कोरोना टेस्ट बंधनकारक
खाजगी व कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रत्येक १५ दिवसांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. त्या संबंधीचे प्रमाणपत्र सर्वांनी सोबत बाळगावे, असेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.