ऑनलाइन वृत्तसेवादेशनवी दिल्ली

सावधान:कॉल,मेसेज किंवा ईमेलच्या माध्यमातून एखाद्या लिंकवर क्लिक करू नका की उत्तर देऊ नका

करोना कालावधीमध्ये देशात बॅकिंगसंदर्भातील फसवणुकीचे प्रमाण सतत वाढत आहे. इंटरनेटचा वाढता वापर आणि ऑनलाइन व्यवहारांसंदर्भात पुरेश्या प्रमाणात साक्षरता नसल्याने ऑनलाइन माध्यमातून होणारे आर्थिक फसवणुकीचे गुन्हा वाढताना दिसत आहेत. सायबर गुन्हेगार याच गोष्टीचा फायदा घेत अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि मोठी रक्कम चोरतात. सध्याच्या काळामध्ये करोनाच्या नावाने फसवणूक होण्याचे प्रमाण खूप वाढलं आहे. अनेकदा कॉल किंवा एसएमएसवरुन लोकांना फसवलं जात आहे. याचसंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने माहिती दिलीय. सरकारने एक ट्विटर हॅण्डल तयार केलं असून त्याचं नाव सायबर दोस्त असं ठेवण्यात आलं आहे. ऑनलाइन फसवणूक आणि इतर महत्वाची माहिती या खात्यावरुन दिली जाते.

मंत्रालयाने नागरिकांना ऑनलाइन फ्रॉडसंदर्भात इशारा दिला आहे. लोकांनी अशाप्रकारच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नये. तसेच कॉल, मेसेज किंवा ईमेलच्या माध्यमातून एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितलं असेल तर ते ही करु नका असा सल्ला मंत्रालयाने दिलं आहे.

मागील वर्षभरामध्ये अशाप्रकारची हजारो प्रकरण समोर आली आहेत जिथे ऑनलाइन लिंक किंवा कॉलवरुन माहिती विचारुन आर्थिक फसवणूक केली जाते. त्यामुळेच आता सरकार आणि बँकांनी या फसवणुकीपासून लोकांना सावध करण्यासाठी ऑनलाइन माध्यमातून मोहीम सुरु केलीय. मात्रं असं असलं तरी या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. सायबर गुन्हेगार नेहमीच वेगवेगळ्या माध्यमांमधून लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरताना दिसतात.

अनेकदा लिंकच्या माध्यमातून हॅकर्स युझर्सची सर्व खासगी माहिती चोरतात. लिंकवर क्लिक केल्याने एवढं काय होणार आहे असा विचार करुन अनेकदा लोकं अशा लिंक्स क्लिक करतात. मात्र असं केल्यास मोबाईलमधील सर्व किंवा काही माहिती थेट हॅकर्सपर्यंत पोहचते. अशाच प्रकारचे मेसेज कसे असतात यासंदर्भात उदाहरण देताना सायबर दोस्तच्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देण्यात आलीय. “सावधान राहा, सायबर गुन्हेगार कोव्हिड-१९ चं कारण देत चमत्कारी उपचार, हर्बल उपचार, लस आणि तातडीने तपासणीच्या नावाखाली ग्राहाकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. आरोग्य विषयक सल्ले किंवा आधी तातडीने पैसे देण्याची मागणी या लोकांकडून केली जाते. अशाप्रकारच्या संशयित कॉल्स, ईमेल्स आणि टेक्सट मेसेजला उत्तर देऊ नका,” असं सायबर दोस्तने म्हटलं आहे.

अशाप्रकारचा कोणताही मेसेज अथवा ईमेल अथवा फोन आल्यास त्याची माहिती सायबर पोलिसांना द्या. तसेच अशाप्रकारच्या अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंक्सवर क्लिक करु नका.