शिक्षक,कर्मचाऱ्यांची भरती टप्प्पाटप्प्याने:माहिती सादर करण्याचे आदेश
राज्यातील वरिष्ठ अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी, असे आदेश उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी सर्व विभागीय सहसंचालकांना दिले आहेत.
राज्यातील अनुदानित महाविद्यालयील शिक्षक, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यापूर्वी 40 टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली होती. मात्र, त्यातील सर्व पदेही भरलेली नाहीत. त्यातच करोनामुळे शासनाने काटकसरीचे धोरण अवलंबिले असून नवीन पद भरतीला निर्बंध घातले असून याबाबत वित्त विभागाने 4 मे 2020 रोजी आदेशही काढले आहेत.
शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती त्वरीत सुरू करण्याची मागणी होत आहे. विविध संघटनांकडून आंदोलनाचे इशारेही देण्यात आले आहेत.
दरम्यान, कोणत्या महाविद्यालयात किती पदे रिक्त आहेत याचा आढावा घेण्यासाठी माहितीची जमवाजमव सुरू झाली आहे. 1 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करून 2018, 2019, 2020 या वर्षातील विद्यार्थी संख्येच्या आधारावर अनुज्ञेय, कार्यरत व रिक्त पदांची माहिती एकत्रित करण्यात येणार आहे.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सांमत यांनी महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांची 100 टक्के पदे टप्प्पाटप्प्याने भरण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रिक्त पदांची माहिती जमा करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. 25 फेब्रुवारीपर्यंत माहिती सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. विभागीय सहसंचालकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व महाविद्यालयांनी माहिती जमा झाल्यानंतर त्याचा अहवाल तयार करून उच्च शिक्षण संचालक कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करावा लागणार आहे.