बीड जिल्ह्यासह मराठवडयातील 8 जिल्ह्यात निर्बंध आदेश जारी
मुंबई, दि. 18 : राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांमध्ये यासंदर्भातील निर्बंध आदेश जारी करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दर रविवार संपूर्ण तर रात्रीही संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण तपासणीचा वेग वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बीड
जिल्ह्यात कोविड विषयक नियमांचा भंग करणाऱ्या मंगल कार्यालय व कोचिंग क्लासेसवर योग्य ती कायदेशीर कार्यवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.
लातूर
विभागातील लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक उपययोजना अंमलात आणण्यासाठी तिन्ही जिल्ह्यांत प्रशासनाकडून बैठका घेण्यात आल्या.
जिल्ह्यात कोविड सदृश्य रुग्णांची कोविड-19 निदान चाचणी होणे आवश्यक असून त्यासाठी लातूर जिल्ह्यातील शासकीय / खाजगी दवाखान्यात येणाऱ्या अशा रुग्णांची कोविड-19 निदान चाचणी करुन घ्यावी व चाचणीत रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्वरित उपचार करावेत. जिल्हयातील मंगल कार्यालये आणि कोचिंग क्लासेस यांनी कोव्हिड च्या निर्देशांचे पालन करावे असे लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सूचित केले आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यात कोविड- १९ च्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचनांची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी यांची निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग अधिनियम 1897 कायदा अंतर्गत जिल्ह्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे निर्देशित केले आहे.
परभणी
जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या हद्दीत दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून ते दि. 28 फेब्रुवारी 2021 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.
जालना
जिल्हात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 15 फेब्रुवारीपासुन ते दि.16 मार्च 2021 चे रात्री 12 वाजेपर्यंत जालना जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय कार्यालयात विविध संघटना, व्यक्ती यांना निवेदन सादर करतांना 5 व्यक्ती पेक्षा अधिक असणार नाही व उपोषण, मोर्चे, निदर्शने याकरिता परवानगी देण्यात येणार नाही यासाठी जिल्हाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 144 चे प्रतिबंधात्मक आदेश लागु केले आहे.
उस्मानाबाद :
विनामास्क आढळून आल्यास प्रथम 500 रुपयांचा दंड करण्यात येईल. पुन्हा तीच व्यक्ती आढळल्यास 1000 रुपये दंड व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले.
नांदेड:
जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असून याबाबत लोकांनी अधिक जागरुकता बाळगून तपासणीसाठी विश्वासाने पुढे सरसावणे आवश्यक आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही चिंतेची बाब असून आरोग्य विभागानेही कोरोना तपासणीचा वेग अधिकाधिक कसा वाढेल याबाबत योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले. नांदेड जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव, आरोग्य विभागाची यंत्रणा आणि प्रशासनातर्फे केले जाणारे नियोजन याची आढावा बैठक डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.