ऑनलाइन वृत्तसेवा

राज्यात चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता:आठ राज्यांना फटका !

मुंबई: शेतकरी आणि फळ बागायतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह देशात 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडेल असा इशारा स्कायमेटनं दिला आहे. या अवकाळी पावसाचा फटका, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओदिशा, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटकचा अंतर्गत भाग, तेलंगाणा आणि तामिळनाडूला बसणार आहे.

पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच विदर्भाच्यावर एक चक्रिवादळी हवेचे क्षेत्र विकसित होऊ शकते. त्यामुळे तेलंगाणमधून दक्षिण तामिळनाडूपर्यंत एक ट्रफ विकसित होऊ शकते.

या दोन्ही हवामानाच्या परिस्थितीमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून बाष्प भूभागावर येईल त्यामुळे हवामान बिघडून पाऊस पडू शकतो असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे.


दुसरीकडे थंडीत पुन्हा अवकाळी पावसाचं आगमन झालं तर शेतकरी आणि बागायतदारांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा चिंतेत आहे. तमिलनाडु, पुद्दुचेरी, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत यंदा पावसाचा जोर होता. तर फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेटनं यासंदर्भात माहिती दिली आहे.