बीड

समाजसुधारक बलभीमराव कदम यांचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रमाणेच- माजीमंत्री जयदत्त

राजकुमार कदम लिखित “समाज सुधारक बलभीमराव कदम” चरित्र ग्रंथाचे शानदार प्रकाशन

बीड,दि.4(प्रतिनिधी)- कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पश्चिम महाराष्ट्रात, पंजाबराव देशमुख यांचे विदर्भात जे कार्य झाले त्याच दर्जाचे मराठवाड्यात समाजसुधारक बलभीमराव कदम यांचे कार्य आहे, अशा शब्दांत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी कै. बलभीमराव कदम यांच्या कार्याचा गौरव केला.


बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गुरुवारी सकाळी 11 वाजता मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव तथा प्रगतशील लेखक राजकुमार कदम लिखित “समाजसुधारक बलभीमराव कदम” या चरित्रग्रंथाचे प्रकाशन झाले.

त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.राजेंद्र जगताप तर व्यासपीठावर माजी मंत्री सुरेश नवले,माजी आ. सुनील धांडे, माजी आ.आदिनाथराव नवले,माजी आ.जनार्दन तुपे,माजी आ.उषाताई दराडे,माजी आ.सिराजभाई देशमुख, सुशिलाताई मोराळे, कॉ.नामदेव चव्हाण, मंगलताई मोरे,अशोक हिंगे, प्रकाश सुस्कर, डॉ.यशवंत खोसे, दिलीप गोरे,अरुण डाके,विलास बडगे,अॅड बप्पा औटे, भानुदासराव जाधव, नानासाहेब काकडे,सखाराम मस्के,गणपत डोईफडे, तांदळे, भारत काळे,सुग्रीव रसाळ,दिलीप ख्रिस्ती, नाना महाराज कदम, गंगाधर काळकुटे, रवींद्र कदम यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले ज्या काळात दळणवळणाची साधने नव्हती,मराठवाडा निजाम राजवटीखाली होता त्या काळात बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली केली, अस्पृश्यता निर्मूलन, जातीजातीतील भिंती खऱ्या अर्थाने मिटवण्याचे काम समाजसुधारक बलभीमराव कदम यांनी केले आहे. ताजा प्रसंग , घटना याची नोंद घेणे सोपे असते परंतु काळाच्या आड दडलेला इतिहास त्याची समर्पक, अचूक नोंद घेणे हे फार अवघड काम असते पण ते अवघड काम राजकुमार कदम यांनी अतिशय समर्पक व वेचक शब्दात बलभीमराव कदम यांच्या चरित्र ग्रंथात केले आहे ही अतिशय उत्तम बाब आहे. या चरित्र ग्रंथाच्या माध्यमातून मराठवाड्यातील झाकलेला” हिरा माणिक -“जगासमोर आला आहे अशा शब्दात या पुस्तकाचा गौरव केला. हे पुस्तक शासकीय यादीवर घेऊन राज्यातील सर्व ग्रंथालयात वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली त्याचबरोबर बलभीम महाविद्यालयात समाज सुधारक बलभीमराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करेल असा शब्दही त्यांनी दिला.

याच कार्यक्रमात माजी मंत्री सुरेश नवले यांनी बलभीम राव कदम यांच्या जीवन चरित्रावर आपल्या अमोघ शैलीतून प्रकाश टाकला. बलभीम राव कदम यांनी स्त्री-पुरुष समानतेचा विचार जपला होता. स्त्री विषयीचे त्यांचे विचार आज पुस्तक रूपात असते त्याला साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला असता. शिस्तीचे ते भोक्ते होते. शिस्तीशिवाय जीवन घडत नाही. त्यामुळे ते पहाटे उठून युवक विद्यार्नाथ्यांना व्यायाम करण्यास लावत असत त्याचबरोबर मस्तक सशक्त व्हावे यासाठी पुस्तकाचे वाचन करण्यासही ते प्रोत्साहित करत असत. अन्यायाचा प्रतिकार करण्याची क्षमता अंगी बाळगावी यासाठी त्यांचा आग्रह असायचा असे मत सुरेश नवले यांनी व्यक्त केले. माजी आ. राजेंद्र जगताप यांनी अध्यक्षीय समारोपात बलभीमराव कदम यांनी जात-पात धर्म सोडून जे काम केले ते विचार आज सर्वांनी आचरणात आणले पाहिजेत. धांडे गल्लीतील तालीम उभारून बलभीम राव कदम यांनी युवकांना सशक्त बनण्यास प्रोत्साहित केले होते आज बलभीमराव कदम यांच्या नावाने जिल्ह्यात एक नवीन वातावरण तयार झाले आहे. अंधारात पडलेला एक हिरा या पुस्तकाच्या माध्यमातून आज उजेडात आला आहे. तरुण पिढीला हा इतिहास निश्चितच मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन त्यांनी केले.

तत्पूर्वी माजी आ. सुनील धांडे यांनी आपल्या भाषणात धांडे गल्लीतील प्रत्येक कार्याचा मान हा कदम घराण्याला आहे. बलभीमराव कदम यांनीच खऱ्या अर्थाने धांडे गल्लीला दिशा दिली आहे. तेच धांडे गल्लीचे खरे आधारस्तंभ आहेत. म्हणूनच रझाकाराच्या जुलमी राजवटीविरुद्ध धांडे गल्लीतील पहिलवाननी झुंज दिली आहे. आज ते जिवंत असते तर इतिहास वेगळा असता अशी टिप्पणीही त्यांनी केली. माजी आ. उषाताई दराडे यांनी बलभीमराव कदम यांचे जीवन कार्य नव्या पिढीला निश्चित दिशादर्शक आहे, तेव्हा हे पुस्तक शासकीय यादीत समाविष्ट करून राज्यातील सर्व ग्रंथालयात उपलब्ध करायला पाहिजे असे मत मांडून हिंदी इंग्रजी व इतर भाषांत हे पुस्तक देशपातळीवर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे असे विचार मांडले. बलभीमराव कदम यांना जरी अल्पायुष्य प्राप्त झाले असले तरी माणूस किती दिवस जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचे असते. त्यांचे काही काळाचे आयुष्य अनेकांचे जीवन बदलणारे ठरले आहे अशा शब्दात बलभीमराव कदम यांच्या कार्याचा प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी गौरव केला. माजी आ. जनार्दन तुपे,कॉम्रेड नामदेव चव्हाण, अशोक हिंगे यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर यशवंतराव खोसे यांनी केले. बलभीमराव कदम यांचे नातू ,बीड बाजार समितीचे सभापती दिनकरराव कदम यांनी पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगानुरूप आपले आजोबा थोर समाज सुधारक बलभीमराव कदम यांच्या विचाराला व कार्याला आपल्या मनोगतातून उजाळा दिला.पुस्तकाचे लेखक राजकुमार कदम यांनी आपले मनोगत मांडताना शाहू -फुले -आंबेडकर यांच्या विचार चौकटीत बसणारे बलभीमराव कदम होते. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या तोडीचे कार्य मराठवाड्यात बलभीम राव कदम यांनी केले आहे. बलभीमराव कदम असते तर देश पातळीवरील एक मोठे व्यक्तिमत्व त्यांच्या रूपाने पहायला मिळाले असते. त्यांच्या विचाराशी जोडलेले शंकराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले भाई उध्दवराव पाटील विरोधी पक्षनेते झाले. असे महान कार्य बलभीमराव कदम यांचे होते त्यांचे कार्य खरोखरच आजच्या युवकांनी अंगीकारणे गरजेचे आहे असे विचार मांडून या पुस्तकासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी अॅड. जगन्नाथराव औटे, दिवंगत प्राचार्य पा.बा.सावंत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. मराठवाडाभर फिरून या पुस्तका साठी संदर्भ गोळा केले आहेत. अनेकांची त्यासाठी मदत झाली आहे. त्यांचे त्यांनी ऋण व्यक्त केले. या बहारदार कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानदेव काशीद यांनी तर आभार प्रदर्शन अॅड बप्पा औटे यांनी केले. या कार्यक्रमाला बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून बलभीमराव कदम व कदम घराण्यावर प्रेम करणारे राजकारणी, प्रतिष्ठित नागरिक शेतकरी व्यापारी शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.