ऑनलाइन वृत्तसेवापुणे

महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय होण्याची शक्‍यता

पुणे – राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी महाविद्यालये सुरू करण्यासाठी सर्व कुलगुरू व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) कृती मानंकनाबाबत चर्चा झाली, पण अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, आता महाविद्यालये सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे याच आठवड्यात महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय होण्याची चिन्हे आहेत.

करोनामुळे यंदा शैक्षणिक सत्र ऑनलाइन सुरू झाले आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. विशेषतः व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करता येत नसल्याने त्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरू करा, अशी मागणी होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 11 जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे तो मागे घ्यावा लागला.

जानेवारी संपत आला तरी अद्याप महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात राज्यपाल कोश्‍यारी यांना ऑनलाइन बैठकीत सर्व कुलगुरुंनी महाविद्यालये सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांनी याबाबत मागणी केली होती