ऑनलाइन वृत्तसेवापुणे

दहावी-बारावीच्या अभ्यासक्रमाबाबत मोठा निर्णय:विद्यार्थ्यांना दिलासा

राज्याची परिस्थिती पाहून 1 मार्चपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे या कालावधीत तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे या कालावधीत होणार आहे.

यंदा शाळा उशिरा सुरू झाल्याने बोर्ड परीक्षेसाठी 25 टक्के अभ्यासक्रम कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 40 टक्के अभ्यासक्रम कपातीची चर्चा होती. त्याला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पूर्णविराम दिला असून, 25 टक्केच अभ्यासक्रम कपात करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

दरम्यान अंगणवाडी व बालवाडी यंदा सुरू करण्याचे नियोजन नसून आगामी शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू करण्याच्या दृष्टीने ठोस नियोजन सुरू आहे. शैक्षणिक वर्ष सुरू करताना शाळा सुरू न झाल्याने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा दोन महिने (1 मार्च ते 30 एप्रिल) भरविण्याचे नियोजन केले जात आहे. त्याबाबत 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.