महाराष्ट्रमुंबईराजकारण

कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश घोषित करा : मुख्यमंत्री

मुंबई : ‘कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा’, कानडी सरकारवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प’ या शासकीय पुस्तकाचं आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. कर्नाटक सरकार उर्मटपणे वागत आहे.” “हे प्रकरण कोर्टात असताना ज्या पद्धतीने आधी बेळगावला उपराजधानी बनवली, मग नामांतर केलं हा कोर्टाचा अपमान नाही का?” असा प्रश्न त्यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की, “एकतर हे सरकार तुमच्या पाठीशी आहे. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांच्यासोबत बैठक आहे. कर्नाटक सरकार कायद्याचा विचार करत नाही. हा विषय तेवढ्यापुरते बोलायचं असतो. मुख्यमंत्री कोणीही असो मराठींवर अन्याय करतात. हा भाग महाराष्ट्रात आणायचा आहे.”