ऑनलाइन वृत्तसेवावृत्तसेवा

नेमकं सत्य काय:पाच दहा शंभराच्या नोटा चलनातून बाद होणार का !

नवी दिल्ली : 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटांबाबत एक वृत्त व्हायरल होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच या नोटा चलानातून हद्दपार करण्याची शक्यता आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे. आरबीआय मार्चनंतर सर्व जुन्या नोटा चलनातून बाहेर करणार असल्याचा दावा यात करण्यात आला होता. परंतु पीआयबी फॅक्ट चेकमध्ये हे वृत्त फेक असल्याचं समोर आलं आहे. #PIBFactCheck ने ट्वीट करुन म्हटलं आहे की, ठहा दावा फेक आहे. आरबीआयने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.” तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही स्पष्ट केलं आहे की, “100,10 आणि 5 रुपयांच्या सर्व जुन्या नोटा वैध असून त्या चलनात कायम राहतील.

या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा सध्या कोणताही विचार नाही.”

PIBFactCheck ने आपल्या ट्विटर हॅण्डलवर याची माहिती देताना ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की “एका वृत्तात दावा केला जात आहे की, आरबीआयच्या माहितीनुसार मार्च 2021 नंतर 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून हद्दपार होणार. PIBFactCheck: हा दावा खोटा आहे. आरबीआयने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

फेक न्यूजमध्ये काय म्हटलं होतं?
5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार होण्याच्या वृत्तांमध्ये अनेक दावे केले आहेत. या वृत्तात म्हटलं होतं की, या नोटा बंद करण्यापूर्वी आरबीआय नागरिकांना त्या बँकांमध्ये जमा करण्याची संधी देईल. या नोटा बँकेत जमा केल्यानंतर जुन्या नोटा सहजरित्या बदलल्या जाऊ शकतील.

या वृत्तात असंही म्हटलं होतं की, नोटाबंदीदरम्यान 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर झालेला गोंधळ पाहता, आरबीआय कोणत्याही जुन्या नोटा अचानक बंद करणार नाही. यासाठी आधी बाजारात तेवढ्या मूल्याच्या नव्या नोटा चलनात आणूनच जुन्या नोटा बंद केल्या जातील. शिवाय असंही म्हटलं होतं की जुन्या नोटांच्या तुलनेत नव्या नोटा आधीच चलनात आलेल्या आहेत.

पीआयबी – सरकारी वृत्त यंत्रणा
पीआयबी ही भारत सरकाराची धोरणं, विविध उपक्रम तसंच कामगिरीबाबत वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या यांना माहिती पुरवणारी प्रमुख एजन्सी आहे. पीआयबीने म्हटलं आहे की, “कोरोना संकटाच्या काळातच नाही तर देशात जेव्हा परिस्थिती बिघडते त्यावेळी फेक न्यूज सोशल मीडियामध्ये व्हायरल होतात. त्यामुळे सोशल मीडियावरुन आलेल्या माहितीची शाहनिशा करुनच त्यावर विश्वास ठेवा.”