आता मतदान कार्डही ऑलनाईन डाऊनलोड करता येणार:पण कसे ते पहा
मुंबई : वोटर आयडी (Voter Id) म्हणजेच मतदान ओळखपत्र आता डिजिटल (Digital Voter Id) झालं आहे आणि ते तुम्ही आपल्या मोबाइल, कम्प्यूटरवर डाऊनलोड करु शकणार आहात. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने २५ जानेवारी २०२१ रोजी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवसापासून भारत निवडणूक आयोग ई-मतदार ओळखपत्राचे Electronic Electoral Photo Identity Card (ई-ईपिक) वाटप सुरू करणार असून मतदारांना त्यांचे ओळखपत्र मोबाइल किंवा संगणाकावर डाऊनलोड करता येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली होती.
याचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोग २०११ या वर्षापासून दरवर्षी २५ जानेवारीला ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करतो. राष्ट्रीय मतदार दिनाच्या देश पातळीवरील मुख्य कार्यक्रम भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली येथे आयोजित करतात. राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करतात.
या कार्यक्रमात नवीन मतदारांना मतदान ओळखपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाकडून हाती घेतलेल्या उपक्रमांच्या चित्रफिती दाखविण्यात येणार आहेत. यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोग ई-मतदार ओळखपत्राचे (ई-ईपिक) वाटप सुरू करणार आहे.
दिल्लीत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद हे ई-ईपीआयसी कार्यक्रमाचा प्रारंभ करतील आणि पाच नवीन मतदारांना ई-ईपीआयसी आणि मतदार ओळखपत्र प्रदान करतील. ई-ईपीआयसी हे मतदार ओळखपत्राचे एक डिजिटल रूप आहे.
असं करता येणार ई-मतदार ओळखपत्र
सर्व प्रथम https://voterportal.eci.gov.in किंवा https://nvsp.in/account/login या संकेतस्थळाला भेट द्या.
यानंतर तुम्हाला लॉग-ईन करावे लागेल. जर तुमचे अकाऊंट नसेल तर मोबाइल नंबरच्या मदतीने तुम्ही अकाऊंट सुरू करु शकता.
वेबसाईटवर लॉग-ईन केल्यावर Download e-EPIC या टॅबवर क्लिक करा.
२५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.१४ नंतर तुम्ही वोटर आयडी डाऊनलोड करु शकणार आहात.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात २५ ते ३१ जानेवारीदरम्यान नव्या मतदारांना डिजीटल मतदान कार्ड उपलब्ध होणार आहे. तसेच मोबाईल नंबर रजिस्टर असणारांना १ फेब्रुवारीपासून डिजीटल मतदान कार्ड मिळणार आहे.