कोरोना कॉलर ट्यून पहिली बंद दुसरी चालू आता महिलेच्या आवाजात
नवी दिल्ली -जगातील सर्वांत मोठी करोना लसीकरण मोहीम भारतात सुरू झाल्याच्या दिवशीच केंद्र सरकारने मोबाईल फोनवरील नवी कॉलर ट्यून जारी केली. त्यासाठी मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या ऐवजी एका महिलेचा आवाज वापरण्यात आला आहे.
करोना संसर्ग टाळण्यासाठी कुठली दक्षता घ्यायची याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशातून सरकारने याआधी एका कॉलर ट्यूनचा आधार घेतला. त्या ट्यूनला बच्चन यांनी आवाज दिला होता. मात्र, त्यांच्या आवाजाचा वापर करण्याला काही घटकांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यासाठी स्वत: बच्चन आणि त्यांच्या कुटूंबातील काही सदस्यांना करोना संसर्ग झाल्याचे कारण पुढे करण्यात आले.
एवढेच नव्हे तर, कॉलर ट्यूनमधून बच्चन यांचा आवाज हटवण्याची मागणी करणारी एक जनहित याचिकाही काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.
अशातच महिलेचा आवाज असणारी हिंदीतील नवी कॉलर ट्यून समोर आली आहे. त्या ट्यूनमध्ये करोनावरील लस केंद्रस्थानी आहे. लसीकरणाबाबत जनजागृती आणि अफवा दूर करणे हा नव्या ट्यूनमागील उद्देश आहे.
नवे वर्ष करोनावरील लसीच्या रूपाने नव्या आशेचा किरण घेऊन आले आहे. भारतात बनलेल्या लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत. त्या करोना संसर्गाविरोधात आपल्याला प्रतिरोधक क्षमता मिळवून देतात. भारतीय लसींवर पूर्ण भरवसा ठेवा. लस जरूर घ्या. अफवांवर कुठलाही विश्वास ठेऊ नका, असे आवाहन नव्या कॉलर ट्यूनमध्ये करण्यात आले आहे. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि नियमित हात धुण्याची सवय कायम ठेवण्याची सूचनाही त्यामध्ये करण्यात आली आहे.