शहरे रिकामी होऊ लागली;गाव कारभाऱ्यांची जवाबदारी वाढली
बीड/प्रतिनिधी
शासनाने शहरात अडकून पडलेल्या नागरिकांना गावी जाण्याची परवानगी दिली. पाच ते सहा दिवसांतच मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरे पटापट खाली झाली. तर दुसरीकडे गावांमध्ये लोक परतल्याने गाव कारभाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. शहरातील लोंढे गावाकडे आल्याने स्थानिक प्रशासन अर्थात ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, आरोग्य विभाग झपाट्याने कामाला लागले आहेत.महामारीचा सामना करत असताना येणार्यांनीही आता स्थानिकांना सहकार्य करणे गरजेचे आहे,आपल्यामुळे इतरांना लागण होणार नाही यासाठी आपली तपासणी करून घेऊनच गावात प्रवेश करायला हवा नसता ही महामारी साऱ्या गावाला वेढा घेऊन बसेल
गावातील प्रत्येक कुटुंबातील दोन-तीन सदस्य नोकरी, उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने शहरात विखुरलेली आहेत; मात्र करोना च्या महामारीने पुन्हा सर्वांना गावची वाट धरावी लागली आहे. त्यामुळे शहरातून येणाऱ्या प्रत्येकाची नोंदणी, तपासणी, क्वारंटाईन होईपर्यंतची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. या लढ्यात आरोग्य विभागातील डाक्टर, आरोग्य सेवकांबरोबर गावचे प्रथम नागरिक सरपंच सुद्धा पुढाकार घेत आपली जबाबदारी पार पडताना दिसून येत आहेत.गावचे सरपंच खऱ्या अर्थाने करोना योद्धा ठरले आहेत. महाराष्ट्रात लॉक डाऊन सुरू होऊन जवळ-जवळ 56 दिवस झाले. या दिवसात ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष व सर्व सभासद आणि विविध संस्थाच्या पदाधिकारी डोळ्यात तेल घालून काम करताना दिसतात. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गावठाण व वाड्या वस्त्यांवर जनजागृती करण्यात येत आहे.ही मोहीम आता यापुढेही काळजी घेऊन राबवली तर नक्कीच कोरोनाचा मुकाबला करू शकणार आहोत,प्रशासनाच्या सूचना सर्वांनी पाळल्या तरच आपण सुरक्षित राहू शकतो हेही तितकेच खरे,शासनाच्या विविध नियमांचे पालन करून नागरिक घराबाहेर पडणार नाही याची काळजी घेतली जाते आहे. बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना नोंदणी व आरोग्य तपासणी करून होम क्वारंटाइन केले जाते. लॉकडाऊनच्या काळात गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. लॉक डाऊन शिथिल झाल्यानंतर हे रस्ते खुले केले; पण बाहेर गावावरुन येणाऱ्यांची चौकशी सुरू ठेवण्यात आली आहे. पुणे, मुंबई, ठाणे व इतर ठिकाणाहून आलेत त्यांना होम क्वारंटाइन करण्यात येत आहे.