ऑनलाइन वृत्तसेवावृत्तसेवा

धक्कादायक बातमी:शिशु केअर युनिटमध्ये आग लागून तब्बल १० नवजात बालकांचा मृत्यू

भंडारा: महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागून तब्बल १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे गुदमरून १० बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्नीशमन दलाला त्वरित घटनेची माहिती देण्यात आली आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं.

मध्यरात्री २ च्या सुमारास घडली घटना

सदर घटना ही मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
एका नर्सला नवजात शिशु केअर युनिटमधून धूर निघत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्या नर्सने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराचा लोट तोंडावर आला, त्यामुळे त्यांना देखील काही दिसले नाही. त्यानंतर नर्सने त्वरित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आणि अग्नीशमन दलाला बोलावण्यात आले.

७ बालकांना वाचवण्यात आले यश

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये १७ बाळांना ठेवले होते. यापैकी १० बाळांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. पण ७ बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे धावपळ करुन ७ बाळांना वाचवले. युनिटमध्ये १७ पैकी १० बाळांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागली आणि दुर्घटना घडली. या प्रकरणी चौकशी होणार आहे.