ऑनलाइन वृत्तसेवाविशेष वृत्त

सर्वोकृष्ट आहार:मोड आलेले कडधान्य खाणे शरीरासाठी फायद्याचेच

मोड आलेले कडधान्य म्हटलं की सगळयात पाहिलं आठवतं ती म्हणजे गरम गरम मिसळ! मोड आलेले धान्य अथवा स्प्राऊट्‌स आरोग्यासाठी उत्तम असतात. मोड आलेले धान्य पौष्टीक आणि चविष्ट लागतात. मोड आलेली धान्ये हा सर्वोकृष्ट आहार समजला जातो. मूग, मटकी, वाल, हरभरा, वटाणा, अशी कडधान्ये खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यावर नाश्‍त्यामध्ये मोड आलेली कडधान्ये खाल्याने शरीराला प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतात.

काय उपयोग होतो खाल्याने स्प्राऊट्‌स –

जर वजन कमी करायचे असेल तर आहारात मोड आलेले कडधान्यांचा समावेश आवश्‍य करा. त्यामध्ये मोठया प्रमाणावर फायबर असतात. ज्यामुळे तुमचं पोट लगेच भरतं आणि वारंवार भूक लागत नाही.
स्प्राऊट्‌स खाल्याने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. यासाठी सकाळी नाश्‍ता करताना त्यात मोड आलेले कडधान्यांचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि उत्साही वाटेल.


स्प्राऊट्‌समुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत करते. मधूमेही लोकांनी मोड आलेल्या मेथी दाण्यांचा आहारात वापर केल्यावर त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
स्प्राऊट्‌समधील व्हिटॅमिन आणि मिनरल्स तुमच्या केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात.
कसे बनतात मोड आलेले कडधान्ये –

मोड येण्यासाठी धान्य किंवा कडधान्याला काही तास पाण्यात भिजवावे लागते.

6 ते 7 तासांनी कडधान्यं भिजून फुगतात. भिजवलेलं धान्य एका स्वच्छ कापडामध्ये रात्रभर बांधून ठेवल्यास त्या धान्याला मोड फुटतात. मोड आलेल्या धान्यांमध्ये व्हिटॅमिन अ, बी, सी आणि डी भरपूर प्रमाणात असते. कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि लोह असते. त्यासोबतच भरपूर फायबर, ओमेगा 3 फॅटी ऍसिड देखील असतात.

स्प्राऊट्‌स खाण्याची योग्य वेळ – सकाळी नाश्‍ता करताना स्प्राऊट्‌स खाणे नेहमीच चांगले असते. सकाळी खाल्याने तुम्हाला दिवसभर वारंवार भूक लागत नाही. मात्र, रात्रीच्या वेळी मोड आलेले कडधान्य खाल्याने त्रास होऊ शकतो. अति प्रमाणात खाल्याने पोटात गॅस, अपचन होण्याची शक्‍यताही असते.

  • डॉ. आदिती पानसंबळ, आहारतज्ज्ञ, अहमदनगर.(जनहितार्थ)