सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन शिस्तपालन नियमावली जाहीर:नियम पाळा अन्यथा कारवाई
मुंबई : सातत्याने कार्यालयात उशिरा येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. उशिरा येणाऱ्या सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांवर आता कार्यवाही करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून यापूर्वी नियमावली जाहीर करण्यात आली होती मात्र, या संदर्भात काही मुद्द्यांबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम निर्माण होत होता. त्यामुळे आता राज्य सरकारकडून पत्रक काढून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार, एकाच महिन्यात तीनपेक्षा अधिक वेळा उशिरा येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.
मंत्रालयीन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय विभाग / कार्यालयांमध्ये एका महिन्यात तीन पेक्षा अधिक वेळा उशिरा उपस्थित राहणाऱ्या व खाती नैमित्तिक रजा नसणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांबाबतीत करावयाच्या कार्यवाहीबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे.
या प्रकरणी खालील सुधारित तरतूदी करण्यात आल्या आहेत.
मंत्रालयीन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय विभाग / कार्यालयांतील अधिकारी / कर्मचारी यांना सकाळी कार्यालयात येण्यासाठी एका महिन्यात जास्तीत जास्त दोन वेळा कार्यालयीन वेळेमध्ये कमाल दीड तास उशिरा येण्याची सवलत असेल. तथापि त्यानंतरच्या तिसऱ्या उशिरा उपस्थितीसाठी संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांची एक नैमित्तिक रजा वजा करण्यात यावी.
संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्या एकाच महिन्यातील तीन पेक्षा अधिक वेळा उशिरा उपस्थितीसाठी (म्हणजेच सहाव्या, नवव्या) प्रत्येकी एक नैमित्तिक रजा वजा करण्यात यावी.
संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे खाती जर नैमित्तिक रजा शिल्लक नसेल तर त्यांचे मागणीनुसार एकाच महिन्यातील प्रत्येक तिसऱ्या उशिरासाठी प्रत्येकी एक या प्रमाणे अर्जित रजा वजा करण्यात यावी.
अर्जित रजा शिल्लक नसल्यास असाधारण रजा (विनावेतन) मंजूर करण्यात यावी.
सदर सवलत महिन्यातील केवळ पहिल्या नऊ उशिरा उपस्थितीसाठी असेल. त्यापुढील उशिरासाठी असाधारण (विनावेतन) रजा मंजूर करण्यात यावी.
परिवर्तित रजा ही केवळ वैद्यकीय कारणास्तव मंजूर करण्यात येत असल्याने कोणत्याही परिस्थितीत उशिरा उपस्थितीसाठी ही रजा मंजूर करण्यात येऊ नये.
दिनांक २४ फेब्रुवारी २०२० च्या शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयांची वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी आहे. सबब गट-अ ते गट-क च्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कार्यालयीन उशिरा उपस्थिती ही सकाळी ९.४५ पासून दीड तास म्हणजेच सकाळी ११.१५ वाजेपर्यंत ग्राह्य धरण्यात यावी.
तसेच शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेळ ही सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी असल्याने त्यांचे बाबतीत उशिरा उपस्थिती ही सकाळी ११ वाजेपर्यंत ग्राह्य धरण्यात यावी.
रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे किंवा कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणाबाहेरील आकस्मिक घटनेमुळे जे कर्मचारी उशिरा येतील त्यांची उशिरा उपस्थिती न मांडता ती क्षमापित करण्यात यावी.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.