देशनवी दिल्ली

आनंदाची बातमी: (ईपीएफओ)८.५ टक्क्यांचे पूर्ण व्याज एकरकमी देण्याची अधिसूचना जारी

दिल्ली : २०१९ या सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी केंद्र सरकारने नोकरदार वर्गाला ‘न्यू ईअर गिफ्ट’ दिले. सरकारने आर्थिक वर्ष २०१९-२० साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफओ)८.५ टक्क्यांचे पूर्ण व्याज एकरकमी देण्याची अधिसूचना जारी केली आहे.

केंद्र सरकारकडून तब्बल ६ कोटींपेक्षा जास्त ग्राहकांच्या खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांआधीच कामगार आणि वित्त मंत्रालयाची व्याज दराशी संबंधित प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडली होती. यामध्ये वित्त मंत्रालयाने जोखीम असणाऱ्या गुंतवणूकीबद्दल चिंता व्यक्त करत तपशील मागवून त्यावर चर्चा केली होती.

कामगार मंत्रालयाकडून अधिसूचना जारी
कामगार आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखालील सप्टेंबरमध्ये पार पडलेल्या बैठकीत कोरोनामुळे ईपीएफओच्या सीबीटीने दोन हप्त्यांमध्ये व्याज देण्याची घोषणा केली होती. यानुसार, दिवाळीपर्यंत ८.१५ टक्के व्याज खात्यात जमा केले जाईल.

तर उर्वरित ०.३५टक्के हिस्सा समभागांच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातून दिला जाईल, असे ईपीएफओने ठरवले होते. मात्र, आता केंद्र सरकारने ईपीएफवरील ८.५०टक्के व्याज ग्राहकांच्या खात्यात एकरकमी वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कामगार मंत्र्यांनी अधिसूचना जारी केल्यानंतर ईपीएफओकडून ग्राहकांच्या खात्यात व्याजाची रक्कम वळविण्यास सुरूवात झाली आहे.