कोरोनाचा नवा स्ट्रेन रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली नियमावली:असे आहेत नियम
नवी दिल्ली: जगभरात कोरोनाच्या लसीच्या संबंधी आशादायक बातम्या येत असताना ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगभरात खळबळ उडाली असून देशोदेशींच्या सरकारांनी त्यावर उपाययोजना म्हणून पावले उचलायला सुरुवात केली आहे. भारतातही या नव्या स्ट्रेनसंबंधी केंर्द्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी नवी नियमावली जाहीर केली आहे.
भारतात आलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी त्यांचा गेल्या 14 दिवसांचा प्रवासाचा इतिहास आणि कोरोना चाचणी केलेला अहवाल जमा करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. ब्रिटनशी सुरु असलेल्या विमानसेवा या 23 डिसेंबर ते 31 डिसेंबर किंवा पुढील आदेश प्राप्त् होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत.
21 डिसेंबर ते 23 डिसेंबर या दरम्यान ब्रिटनमधून भारतात आलेल्या प्रवाशांसाठी खालील सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारांनी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटी पीसीआर टेस्ट करण्यात आली आहे याची खात्री करुन घ्यावी. असे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांची लॅबमधून spike gene-based RT-PCR ही चाचणी करण्यात यावी.
असे प्रवासी पॉझिटिव्ह सापडल्यास त्यांच्या इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनची वेगळी व्यवस्था करण्यात यावी. त्यांचे सॅम्पल्स पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे किंवा इतर संस्थामध्ये पाठवण्याची व्यवस्था करावी आणि त्याचे genomic sequencing करण्यात यावे.
जर त्यामध्ये संक्रमणाचा प्रसार करणाऱ्या व्हायरसचा शोध लागला तर भारतात यापूर्वी असलेल्या SOP नुसार त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत. जर अशा प्रकारचा व्हायरस नसेल तर होम आयसोलेशन करण्यात यावं.
जर रुग्णाच्या genomic sequencing मध्ये SARS-CoV-2 चा नवा स्ट्रेन सापडला तर संबंधित रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. त्यावर नियमानुसार उपचार करण्यात येणार आहेत. पॉझिटिव्ह आल्यानंतर 14 दिवसांनी पुन्हा एकदा RT-PCR चाचणी करण्यात येईल. त्यावेळी जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यानंतर संबंधित रुग्णाचे 24 तासात घेण्यात आलेले दोन वेगवेगळे नमुने निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत उपचार सुरुच राहतील.
ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चेक-इनच्या आधी प्रवाशांना SOP ची संपूर्ण माहिती देण्याची व्यवस्था संबंधित एअरलाइंन्सनी करावी.