महाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रात मास्कसक्ती लागू होणार;कोरोना टेस्ट वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबईः कोरोनाच्या नव्या विषाणूने बाधीत सहा रुग्ण भारतात आढळले आहेत. हे सर्वजण इंग्लंडमधून आले होते. यामुळे इंग्लंडमध्ये निर्माण झालेले कोरोनाच्या नव्या विषाणूचे संकट भारतात येऊन धडकले आहे. या नव्या संकटाला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने उपाय करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती लागू करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाला दिली. तसेच दैनंदिन कोरोना चाचण्यांची संख्या वाढवा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाला केली. (mask compulsion in maharashtra)
कोरोनाच्या नव्या विषाणूने बाधीत रुग्ण इंग्लंडसह आणखी काही देशांमध्ये सापडले आहेत.

कोरोनाच्या मूळ विषाणूमध्ये चार हजारपेक्षा जास्त वेळा बदल (म्युटेशन) झाले आहेत. मागील काही दिवसांत प्रचंड वेगाने विषाणूच्या रुपात किमान बारा वेळा बदल झाले. प्रत्येक स्वरुपातला विषाणू हा संसर्ग वाढवत आहे. संसर्ग वेगाने वाढवणारे कोरोना विषाणूचे हे ताजे अवतार इंग्लंडमधील संकटाची तीव्रता दररोज वाढत आहेत. डिसेंबर महिन्यात आढळलेल्या नव्या कोरोना रुग्णांपैकी बहुसंख्य रुग्णांना कोरोना विषाणूच्या नव्या घातक अवताराची बाधा झाली आहे. विषाणूत झालेल्या ताज्या बदलांनंतर कोरोना रुग्ण वाढू लागल्यामुळे इंग्लंडने लसीकरण सुरू असले तरी देशात लॉकडाऊन राबवण्याचा निर्णय घेतला आहे. नाताळ सण साजरा करण्यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांना बंधनांचे पालन करा असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. कोरोना संकटाच्या ताज्या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाय करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. याप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव तसेच प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. ऑक्सीजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा पुरेसा साठा करण्याच्या तसेच संस्थात्मक क्वारंटाइनसाठी मोठ्या प्रमाणावर नव्याने तरतूद करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

स्थानिक पातळीवर कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होतात का याचा अभ्यास टास्क फोर्समधील डॉक्टरांनी करावा. नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे उपचाराची पद्धत कशी असावी याबाबत टास्कफोर्सने अभ्यास करुन सूचना द्याव्या, असे मुख्यमंत्री म्हणाले. माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सहव्याधी (कोमॉरबिड) असलेल्या लोकांचा राज्यभरातील डेटा (माहिती) आरोग्य विभागाकडे आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेने अशा सहव्याधी रुग्णांशी संपर्क करावा, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची आरोग्यविषयक काळजी घेतानाच त्यांना सतर्क करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मास्क वापरणे, ठराविक कालावधीनंतर हात साबण अथवा सॅनिटायझरने स्वच्छ धुणे, सोशल डिस्टंस राखणे, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याच्या नियमांचे पालन करणे हे कोरोना तसेच अनेक संसर्गजन्य आजारांपासून स्वतःला वाचवण्याचे सोपे आणि सहज शक्य असलेले उपाय आहेत. या संदर्भात मोठ्या प्रमाणावर नव्याने जनजागृती करावी तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती लागू करावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाला केली. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.