ऑनलाइन वृत्तसेवावृत्तसेवा

अयोध्येतील मशीद असेल जगातील निवडक मशिदींपैकी:सौंदर्याचा आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना

नवी दिल्ली, 19 डिसेंबर: गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या बाबरी मशीद प्रकरणाचा तिढा आता सुटला आहे. अयोध्येत बाबरी मशीदीच्या ठिकाणी आता भव्य दिव्य राम मंदिर उभारलं जाणार आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये याचं भूमीपूजनही करण्यात आलं आहे. बाबरी प्रकरणात निकाल देताना, न्यायालयानं मुस्लिम समुदायालाही काही जमीन देवू केली होती. ती जमीन बाबरी मशीदीपासून काही अंतरावरच आहे. त्याठिकाणी उभारण्यात येणारी धन्नीपूर मशीद कशी असेल, याची अनेकांना उत्सुकता होता. आज नुकताच याचा आराखडा जाहिर झाला आहे.

ही मशीद जगातील निवडक मशिदींपैकी एक असेल. तसेच मशीद सौंदर्याचा आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असेल.
या मशिदीचं डिझाईन आणि आर्किटेक्ट आज लाँच करण्यात आलं आहे. या मशिदीच्या डिझाइनमध्ये ग्रंथालय आणि रुग्णालयही असणार आहे. इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन तयार करत असलेल्या या मशिदीचं वैशिष्ट्यं म्हणजे त्याची रचना होय. मधोमध गोल घुमट असलेली ही मशिद खूपच आकर्षक असेल. तसेच चित्रात दिसत असलेल्या चकोर परिसरात एक संग्रहालय, रुग्णालय, ग्रंथालय आणि कम्युनिटी किचन बांधलं जाणार आहे.

ही गोल मशिद पारंपारिक मशिदींपेक्षा वेगळी असेल आणि यामध्ये आधुनिक कलेचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे. दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी (JMI)च्या आर्किटेक्चर विभागाचे डीन प्रोफेसर एस एम अख्तर यांनी सांगितलं, की हा प्रकल्प म्हणजे केवळ धार्मिक स्थळ असणार नाही, तर मानवतेची सेवा देणारं एक केंद्र असणार आहे. म्हणूनच यामध्ये हॉस्पिटल आणि लायब्ररी बनवण्याकडे समान लक्ष दिलं जात आहे. ही मशीद पारंपरिक नव्हे तर भविष्याला साद घालणारी असेल.

प्रो. अख्तर यांनी पुढं सांगितलं, की आज जगात अनेक नवं नवीन गोष्टी तयार केल्या जात आहेत. त्यामध्ये प्रत्येक देश आपली कलात्मक शैली वापरत आहे. त्यामुळं या मशिदीतही इंडो-इस्लामिक वास्तुशास्त्राचा उपयोग केला जाणार आहे. या मशिदीची रचना समकालीन पद्धतीची असेल. यामध्ये जुन्या आणि पारंपरिक पद्धतीचं डिझाइन यामध्ये अजिबात वापरलं जाणार नाही. याठिकाणी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानापासून सर्व सामान नवीन असेल, असंही त्यांनी सांगितलं