चमत्कार:उत्खनन करत असताना 1000 वर्ष जुनं मंदिर सापडलं
उज्जैन, 20 डिसेंबर: महाकालची नगरी उज्जैनमध्ये शनिवारी कोणताही चमत्कार घडला नाही, पण जे घडलं आहे ते चमत्कारापेक्षा कमी नाही. येथे गेल्या एक वर्षापासून महाकाल मंदिराचा विस्तार सुरू आहे. याचं काम आज अचानक थांबवण्यात आलं आहे. कारण येथे उत्खनन करत असताना 1000 वर्ष जुनं मंदिर सापडलं आहे. येथे सापडलेल्या मंदिराच्या भिंतीवर आणि दगडावर नक्षीकाम केलेलं आहे. याची माहिती मिळताच पुरातत्व विभागासह विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.
पुरातत्व विभागाचे अधिकारी रमण सोलंकी यांनी सांगितलं की, स्मार्ट सिटी अंतर्गत या महाकाल मंदिराच्या विस्ताराचं काम सुरू होतं. याठिकाणी उत्खनन करत असताना काही महत्त्वपूर्ण अवशेष सापडले आहेत.
अशाप्रकारचे अवशेष आम्हाला पहिल्यांदाच सापडले असून याप्रकारची रचना आम्ही कधीही पाहिली नाही, असंही त्यांनी सांगितलं.
हे मंदिर परमार साम्राज्याच्या काळातलं आहे
उत्खनन करताना आम्हाला पहिल्यांदाच 1000 वर्ष जुनं मंदिर सापडलं आहे. जेव्हा आम्ही पूर्ण खोदकाम करू तेव्हाच आम्हाला या मंदिराचा आकार कळू शकेल. हे सर्व अवशेष इल्तुतमिशच्या आक्रमणाच्या वेळीची असल्याचं प्रथमदर्शनी वाटत आहे. याठिकाणी मंदिर तोडून त्यावर भराव बांधल्याचं स्पष्टपणं दिसून येत आहे. हे मंदिर परमार राजवटीच्या काळातलं असून ते 1000 वर्ष जुनं आहे.
गेल्या वर्षभरापासून सुशोभीकरणाचं काम सुरू आहे
12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या विस्ताराचं काम गेल्या 1 वर्षापासून सुरू आहे. येथे पार्किंग, शौचालयांसह सर्व सुविधांयुक्त सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. याठिकाणी कॉम्प्लेक्स देखील उभारण्यात येणार आहे. सध्या महाकाल मंदिराच्या मुख्य गेटवर उत्खनन सुरू होतं, ते थांबविण्यात आलं आहे. या उत्खननात सापडलेल्या जुन्या मंदिराची माहिती वाऱ्यासारखी पसरली. या परिसरात हे जुनं मंदिर पाहाण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी वाढत आहे.