पिसाळलेल्या बिबट्याला जेरबंद करा,बेशुद्ध पाडा,शक्य न झाल्यासच ठार माराअसा आदेश
आष्टी तालुक्यातील तिघांचा आणि करमाळा परिसरातील एकाचा जीव घेणाऱ्या पिसाळलेल्या बिबट्याला जेरबंद करा, बेशुद्ध पाडा, तसे शक्य न झाल्यासच ठार मारा असा आदेश मुख्य वन जीवरक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालु्क्यातील धुमाकूळ घालणाऱ्या आणि पिसाळलेल्या बिबट्याने तिघा जणांचा जीव घेतला आहे. तर दोघांना गंभीर जखमी केले आहे. त्यानंतर या बिबट्याची स्वारी करमाळा तालुक्याकडे वळाली. त्याही ठिकाणी एकाचा जीव त्याने घेतला आहे.
या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आष्टीचे आमदार सुरेश धस आणि बाळासाहेब आजबे यांनी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्य वनरक्षक नितीन काकोडकर यांच्याकडे केली होती
या पत्रव्यवहारानंतर मुख्य वन जीवरक्षक नितीन काकोडकर यांनी आदेश जारी केला आहे. आष्टी तालुक्यातील सुर्डी, किन्ही, मंगरूळ, पारगाव, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, लिंबेवाडी या परिसरात नरभक्षक बिबट्या धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे मानवी जीवनास धोका निर्माण झाला आहे.
या बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जणांनी जीव गमावला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. या बिबट्याला जेरबंद करा, बेशुद्ध करा आणि शक्य न झाल्यास अधिक मनुष्यहानी टळण्याच्या दृष्टीने ठार मारा अशी परवानगी दिली आहे.
सदर कारवाई करण्यास मुख्य वनरक्षक प्रादेशिक संभाजीनगर, मुख्य वनरक्षक पुणे यांनी प्राधिकृत केलेले कर्मचारी, पोलीस अधिकारी, इतर व्यक्ती यांना अधिकृत करण्यात येत आहे. हा आदेश 21 जानेवारी 2021 पर्यंत वैध राहिल असेही म्हटले आहे. सदर बिबट्याला ठार मारण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पारितोषिक जाहीर करण्यात येवू नये असे म्हटले आहे.