राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय;जातीवाचक वस्त्याची नावे बदलणार
मुंबई, 2 डिसेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्यात असंख्य लोकवस्त्या आहेत. या वस्त्यांना जातींवरून नावं देण्यात आलेली आहेत. मात्र, आता अशा वस्त्यांना असलेली जातींची नावं हद्दपार होणार आहेत.
सामाजिक न्याय विभागानं यासंदर्भात एक प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात अनेक शहरात कुंभार वाडा, तेली पूरा, बारी पुरा, चांभार वाडा, ब्राह्मण आळी, सुतार गल्ली, सोनार वाडा, गवळी चाळ आदी नावं वस्त्यांना देण्यात आली आहेत.
जातीच्या या खुणा पुसून टाकण्याऐवजी त्या वर्षानुवर्षे त्या जपल्या जात आहेत. विशेष म्हणजे एकविसाव्या शतकात या वस्त्यांची सरकारी रेकॉर्डवरील नोंदही तशीच आहे. त्यामुळे समाजात जातीय सलोखा, त्याबरोबर एकीची भावना निर्माण होण्यास अडथळा येत आहे. मात्र, या निर्णयामुळे आता जाती पातीमधील वेगळेपणा कायमचा बंद होऊन एकीची भावना वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
याबाबत नगरविकास आणि ग्रामविकास विभागातर्फे त्यासाठीचा मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात येणार आहे.या वस्त्यांना महापुरुषांची नावं दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना असणार आहे.