लसीकरण मोहीमेची तयारी युद्धपातळीवर:सरकारकडून जोरदार तयारी
देश-विदेशातून कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी लस मिळणार याचे संकेत मिळताच केंद्र सरकारने कोरोनाला रोखण्यासाठीच्या देशव्यापी मोहिमेची पूर्वतयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. केंद्राने लसटोचणी कर्मचाऱयांची यादी बनवायला सुरुवात केली आहे. येत्या 2021 वर्षाच्या सुरुवातीला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी हिंदुस्थानींना ही लस टोचण्याचे संकेत केंद्राने दिले आहेत. अन्य नागरिकांना टप्प्याटप्प्याने ही लस वितरित केली जाणार आहे.
देशात आणि जगभरात तयार होणाऱया कोविड-19 लसींना वैद्यकीय मंजुरी मिळताच देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली जाणार आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात 70 हजार लसीकरण सरकारी कर्मचारी आहेत. त्यात खासगी वैद्यकीय क्षेत्रातील 30 हजार कर्मचारी आणि अधिकाऱयांची भर मोहीम सुरू झाल्यावर पडणार आहे. कोरोनाची लस कशी टोचावी आणि लसीकरण मोहिमेद्वारे रुग्णांची कशी काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण नामवंत वैद्यकीय तज्ञांकडून देशातील डॉक्टर्स, नर्सेस आणि लॅब असिस्टंट्सना देण्यात येणार आहे. कोरोना लसीला मंजुरी मिळताच प्रशिक्षित लसीकरण कर्मचाऱयांद्वारे कोरोना लसीकरण सुरू करण्याची सज्जता केंद्र सरकार करीत आहे.
लसीकरणाचा सरासरी वेग कमीच असणार
कोरोना लसीकरणात प्रशिक्षित लसीकरण कर्मचारी तासाला 20 ते 25 नागरिकांना लस टोचू शकणार आहेत. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा वेग तसा कमीच असेल, असेही केंद्र सरकारने जाहीर केले आहे. 70 हजार कर्मचारी या देशव्यापी कोरोना लसीकरणात सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्राधान्याने प्रथम आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱयांना कोरोना लस टोचली जाणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा सरासरी वेग कमीच राहणार आहे.
तज्ञ संस्था, संघटनांचे मार्गदर्शन घेणार
कोरोना लसीचे देशव्यापी वितरण केंद्रासाठी परीक्षेची घडी ठरणार आहे. त्यामुळे देशभरात कोरोना लस कशी पोचवावी आणि तिचे वितरण गटनिहाय कसे करावे, याचे मार्गदर्शन घेण्यासाठी आणि वितरणासाठी केंद्र सरकार फिक्की (FICCI), सीआईआई (CII) आणि अन्य तज्ञ संघटनांची मदत घेणार आहे. केंद्र लस खरेदी, वितरण आणि लसीकरणाच्या प्रक्रियेचे सुसूत्रीकरण करण्यासाठी ‘कोवीन’ची स्थापना करणार आहे. कोवीनमार्फत देशातील डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचाऱयांचा डेटा तयार करून लसीकरण प्रक्रिया सोपी करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. कोवीनवर देशातील नामवंत डॉक्टर्स, वैद्यकीय तज्ञ, लॅब तंत्रज्ञांची नियुक्ती केली जाणार असल्याचेही केंद्राने घोषित केले आहे.