ऑनलाइन वृत्तसेवा

राज्यातीलअंगणवाडी सेविका,मदतनीस यांना पात्रतेनुसार पदोन्नती

करोनाच्या काळात खऱ्या अर्थाने करोना योध्दे म्हणून काम करणाऱ्या राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पात्रतेनुसार पदोन्नती देणार असल्याचे माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी दिली. जळगाव जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिला व बाल विकास विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्या.

बालकांचे संरक्षण होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापन करणे आवश्‍यक आहे. तसेच ग्राम बाल संरक्षण केंद्र स्थापन करावे. प्रत्येक गावात सुसज्ज अशा अंगणवाड्या असाव्यात याकरीता जिल्हा परिषदेच्या सेस व जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून अंगणवाडीचे बांधकाम करण्यात यावेत
तसेच याठिकाणी मुलांना पिण्याचे स्वच्छ पाणी व शौचालयाची व्यवस्था असणे आवश्‍यक आहे.

करोनाच्या काळात राज्य शासनाच्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांचे मानधन वेळेवर दिले पाहिजे. जिल्ह्यातील महिला व बालकांचा विकास व्हावा, त्यांचे संरक्षण व्हावे याकरीता प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन उभारण्यात येणार आहे.

त्याकरीता तातडीने जागा उपलब्ध करुन घ्यावी. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून 3 टक्के निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.