आष्टीबीड

बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू; आष्टी तालुक्यातील घटना

बीड – जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढू लागली असून या परिसरातील नागरिकांवर बिबट्या सातत्याने हल्ले करू लागला आहे. दोन दिवसापूर्वी पंचायत समिती सदस्य पतीला ठार मारल्यानंतर काल शिरूर कासार तालुक्यातील एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. शुक्रवारी या बिबट्याने एका दहा वर्षीय मुलाला उचलून नेत ठार मारले. हा प्रकार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आष्टी तालुक्यातील किन्ही येथे घडला आहे. स्वराज सुनील भापकर असे मृत मुलाचे नाव आहे.

यापूर्वीही बिबट्याचे दोन जणांवर हल्ले, एकाचा मृत्यू –

या प्रकारामुळे संपूर्ण आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाचे पथक या बिबट्याच्या शोधासाठी निघाले आहे. स्वराज सुनील भापकर (वय-१० रा.भापकरवाडी.ता.श्रीगोंदा) हा आपल्या आजीच्या गावाकडे किन्ही येथे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आला होता. दुपारी 1 च्या सुमारास स्वराज आपल्या नातेवाईकांसोबत घराशेजारील रानामध्ये गेला. यावेळी त्याचे नातेवाईक तुरीला पाणी देत असताना या बिबट्याने स्वराजवर झडप घातली आणि त्याला तोंडात पकडून काही अंतरावर घेऊन जात ठार मारले. या प्रकारानंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनविभागाची पथके बिबट्याच्या शोधात निघाली आहेत. दरम्यान या प्रकारामुळे आष्टी तालुक्यात मात्र खळबळ उडाली आहे.तसेच गेवराई तालुख्यात देखील खलेगाव परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत