मोबाईल नंबरवर फोन करण्याच्या नियमात होणार महत्त्वाचा बदल
नवीन वर्षामध्ये देशात कोणत्याही लँडलाइन फोनवरुन मोबाईल नंबरवर फोन करण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल होत आहे. ‘ट्राय’च्या (Telecom Regulatory Authority of India – TRAI) आदेशानुसार लँडलाइनवरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठी मोबाईल नंबरआधी शून्य हा क्रमांक डायल करावा लागेल. ‘ट्राय’चा हा नवा आदेश 1 जानेवारी 2021 पासून लागू होणार आहे.
ट्रायने याबाबत दूरसंचार विभागाला शिफारस केली होती. दूरसंचार विभागाने ट्रायची शिफारस स्वीकारली असून टेलिकॉम कंपन्यांना एक जानेवारीपर्यंत आवश्यक व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. तशाप्रकारचं परिपत्रक विभागाकडून जारी करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांना नव्या फोन नंबरचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.
एक जानेवारीपासून एखाद्या व्यक्तीने शून्य न लावता लँडलाइनवरुन मोबाईल नंबरवर फोन लावल्यास त्याला पहिले शून्य डायल करण्यास सांगितलं जाईल. दरम्यान, भविष्यात टेलिकॉम कंपन्या 11 अंकी मोबाइल नंबरही जारी करु शकतात. सध्या देशात मोबाईल ग्राहकांची संख्या वेगाने वाढतेय, त्यामुळे 10 अंकी मोबाईल नंबर कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.