ऑनलाइन वृत्तसेवाऔरंगाबाद

दुकानात विनामास्क ग्राहकाला सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!

औरंगाबाद | राज्यात कोरोनाचे रूग्ण पुन्हा काही प्रमाणात वाढत असल्याचं दिसून आलंय. औरंगाबादमध्येही रूग्ण वाढत असल्याचं चित्र आहे. शहरात जर कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली तर पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार करण्यात येईल असं महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांड्ये यांनी सांगितलंय.

महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना नियमांचे 100 टक्के पालन करावं लागणार असल्याचं आवाहन केलंय. त्याचप्रमाणे विनामास्क ग्राहकाला दुकानात सामान दिल्यास त्या व्यापाऱ्याचं दुकान 15 दिवसांसाठी बंद करण्यात येईल, अशा मोठा निर्णय देखील घेतलाय.

आस्तिक कुमार पांड्ये यांच्या सांगण्यानुसार, “बाजारपेठेत खरेदीसाठी नागरीक गर्दी करत असल्याचं दिसतंय. सार्वजनिक ठिकाणी तसंच रस्त्यावर मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आलं आहे. याचसोबत व्यापाऱ्यांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.”

मंगल कार्यालयांमध्ये केवळ फक्त 50 नागरिकांना परवानगी दिलेली आहे. मात्र हा नियम पाळला जात नाहीये. शहरातील सर्व मंगल कार्यालयांना शेवटचे अल्टिमेटम देण्यात येत आहे. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास थेट कारवाईला सामोर जावं लागेल असा इशाराही देण्यात आलाय.