पुन्हा लॉकडाउन नाही पण निर्बंध मात्र कडक होणार
मोठ्या प्रमाणात अन्लॉक केल्याने कोरोनाची दुसरी लाट कदाचित येऊ शकते. पण ती किती मोठी असेल हे आज सांगता येत नाही. मात्र, पुन्हा लॉकडाउन करण्याचा राज्य सरकारचा विचार नसून निर्बंध कडक केले जातील, अशी ग्वाही राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
देशाच्या तुलनेत राज्यातील कोरोना रुग्ण वाढीचा दर खूप कमी आहे. राज्याची स्थिती समाधानकारक असून कोरोना रुग्ण संख्या कमी झाली आहे. या उलट गोवा, केरळ, दिल्लीसह अन्य राज्यात रुग्णसंख्या वाढत आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आम्ही जिल्हाधिकार्यांना चाचणीबाबत टार्गेट देत आहोत.
सार्वजनिक ठिकाणी काम करणार्यांची तसेच ज्यांना लक्षणे आहेत त्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्याचे टोपे यांनी सांगितले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर टेस्ट कमी झाल्या आहेत पण आपण पुन्हा टेस्ट वाढवत आहोत. त्यामुळे 2 हजारवर आलेला आकडा 4 हजारवर गेलेला दिसत आहे. त्यामुळे आम्ही टेस्टिंगचे टार्गेट देणार आहोत असेही टोपे म्हणाले.
लॉकडाऊनच्या बाबतीत चर्चा करण्यात आलेली नाही. आपली संख्या वाढत असेल आणि लोक ऐकणार नसतील तर काही निर्बंध टप्प्याटप्प्याने घालावे लागतील. याबाबत नियम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर एक बैठक होईल आणि मर्यादित निर्बंध लावता येतील का याचा निर्णय घेऊ, असेही टोपे म्हणाले.
जनहिताचा दृष्टीने आपल्याला अन्लॉक करावे लागले होते. आता लोकांनी नियम पाळले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.