ऑनलाइन वृत्तसेवानवी दिल्ली

आयुर्वेदिकची पदवी घेतलेल्या डॉक्टरांनाही करता येणार सर्जरी:केंद्र शासनाचा निर्णय

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : आयुर्वेदिक डॉक्टरांसंदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आयुर्वेदिकची पदवी घेतलेल्या डॉक्टरांना आता जनरल आणि ऑर्थोपेडिक सर्जरीसोबत डोळे, कान आणि घशाची सर्जरी करता येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिली असल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेकडून या निर्णयाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. पदवीत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेबद्दल सखोल माहिती देखील दिली जाणार आहे.

आयुर्वेदिकच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली जात होती. त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये देखील याचा समावेश होता मात्र प्रत्यक्षात शस्त्रक्रिया करण्यासाठी नव्या गाइलाइन्स जारी करण्यात आल्या नव्हत्या.

या संदर्भात केंद्र सरकारनं नव्या गाइडलाइन्समध्ये आयुर्वेदिकची पदवी घेतलेल्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.
केंद्र सरकारनं काढलेल्या नियमावलीनुसार पोस्ट ग्रॅज्युएट (PG) पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, डॉक्टरांना आता डोळे, नाक, घसा, कान याची सर्जरी करण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना विशेष माहिती आणि प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.

या विद्यार्थ्यांना अथवा डॉक्टरांना ग्लुकोमा, मोतीबिंदू, स्तनांमधील गाठी, अल्सर आणि पोटाच्या त्वचेसंदर्भातील काही सर्जरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ या विद्यार्थ्यांना माहिती दिली जात होती मात्र प्रत्यक्षात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. केंद्र सरकारनं या संदर्भात काही गाइडलाइन्समध्ये बदल केला असून आता आयुर्वेदिकच्या डॉक्टरांना देखील या शस्त्रक्रिया करता येणार आहेत.