धक्कादायक:उस्मानाबाद मध्ये 48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह
उस्मानाबाद : जिल्ह्यातील 48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. श्रीपतराव भोसले हायस्कूलमधील 20 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. 23 नोव्हेंबरपासून 9 वी ते 12 शाळा सुरू होत आहेत. त्याचदरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
491 शाळेतील 4 हजार 593 शिक्षकांपैकी 3 हजार 702 शिक्षकांची कोरोना चाचणी पूर्ण झाली आहे. शाळेची घंटा वाजण्यापूर्वी कोरोनाची धोक्याची घंटा वाजल्यानं अनेकांच्या मनात भीतीनं घर केलं आहे.
राज्यातील 9 वी ते 12 पर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालय 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यापूर्वी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांचे आणि संबंधित स्टाफ, कर्मचारी यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मात्र अनेक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्याचं भीतीचं वातावरण पसरलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले असून, त्यात उस्मानाबाद शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या 20 शिक्षकांचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक शाळेतील शिक्षकांच्या कोरोना तपासणीसाठी तपासणी केंद्रात रांगा लागल्या असून, 48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कूलमधील जवळपास 20 च्यावर शिक्षक व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह सापडलेल्या अनेक शिक्षकात कोरोनाची कोणतीही थंडी, ताप, सर्दी आणि खोकला अशी लक्षणे नव्हती. अनेक शिक्षक हे असिम्टोमॅटिक होते.