ऑनलाइन वृत्तसेवापुणे

कोरोनावरील कोविशिल्ड लस अवघ्या 500 रुपयात उपलब्ध होणार

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनावरील लस तयार करण्यासाठी विविध वैज्ञानिक संस्था कार्यरत आहेत. भारतात कोरोनावर काही लसींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यावर सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पुढच्या चार ते पाच महिन्यांत कोरोनावरील लस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या लसीची किंमत पाचशे रुपये असणार आहे. सीरमकडून तयार करण्यात आलेल्या लसीचे नाव कोविशिल्ड आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनावरील लस बाजारात उपलब्ध होणार आहे. तसेच या लसीचा ज्येष्ठ नागरिकांवरही चांगला परिणाम होत आहे. दरम्यान आपण या लसीपासून आपण किती कालावधीसाठी सुरक्षित राहू हा मुख्य प्रश्न आहे.
आतापर्यंत या लसींचे परिणाम उत्तम आहेत, असे पूनावाला म्हणाले. हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप समिट २०२० या कार्यक्रमात बोलताना पूनावाला यांनी ही माहिती दिली.

या लसीमुळे आपण किती कालावधीसाठी सुरक्षित राहू याचे उत्तर पुढचा काळ देईल. सध्या याबाबत कोणतीही ग्वाही देता येणार नाही. याबाबत आपण केवळ दावा आणि अंदाज बांधू शकत असल्याचेही पुनावाला यांनी नमूद केले.

दरम्यान. पुनावाला पुढे म्हणाले की, कोविशिल्ड लस एका व्यक्तीला ५०० रुपयांना मिळणार आहे. सरकार मोठ्या प्रमाणात लसीची खरेदी करेल. त्यामुळे ही लस कमी किंमतीत उपलब्ध असेल. आम्ही लवकरच दर महिन्याला १० कोटी डोस तयार करणार आहोत, असेही पुनावाला यांनी सांगितले. आम्ही उत्पादन क्षमता वाढवत आहोत आणि जुलैपर्यंत भारतात ३० ते ४० कोटी डोस देणार असल्याचे पूनावाला म्हणाले.