मुंबई बेस्टसेवेसाठी गेलेल्या परिवहन कर्मचा-यांना कार्यमुक्त करा-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांची मागणी
बीड, दि.१९ (प्रतिनिधी)- मुंबईमध्ये बेस्ट सेवेसाठी बीड जिल्ह्यातून ४०० चालक वाहक गेले आहेत. त्यातील १०९ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. बीड जिल्ह्यातील या कर्मचा-यांची २० दिवसाची सेवा पूर्ण होत आहे. त्यांना तातडीने कार्यमुक्त करावे अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांना दिलेल्या निवेदनात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अशी मागणी केली आहे की, बीड जिल्ह्यातील चालक-वाहक ४०० कर्मचारी बेस्ट सेवेसाठी मुंबई येथे सध्या कार्यरत आहेत. या नियुक्त केलेल्या कर्मचा-यांची कोरोना चाचणी केली असता तब्बल १०९ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. उर्वरित कर्मचा-यांची २० दिवसांची सेवा २० नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे.
यापूर्वी महाराष्ट्रातील सांगली परिवहन महामंडळातील कर्मचा-यांनी २० दिवसांची मुंबई बेस्टची सेवा पूर्ण केली होती. त्या अनुषंगाने बीड जिल्हा आगारातील मुंबईकरांच्या सेवेत गेलेल्या परिवहन कर्मचा-यांना कार्यमुक्त करावे त्यामुळे भविष्यात ते कोरोनाच्या संसर्गापासून अलिप्त राहतील असे म्हटले आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी परिवहन कर्मचा-यांसाठी केलेली ही मागणी रास्त असून या मागणीची पुर्तता व्हावी अशी अपेक्षा कर्मचा-यांनी व्यक्त केली आहे