ऑनलाइन वृत्तसेवा

सावधान:राज्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला:पुण्यात आकडेवारी अधिक

राज्यात करोनाच्या संसर्गात वाढ होत असल्याचे चित्र आहे. कारण गेल्या काही दिवसांत कमी होत झालेल्या बाधित रुग्णांची संख्येत गेल्या तीन दिवसांपासून वाढ होत आहे. आज दिवसभरात राज्यात ५,०११ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या करोना बाधितांच्या संख्येमुळे राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ही १७,५७,५२०वर पोहोचली आहे. तर आज ६,६०८ रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने आणि त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात सध्या ८०,२२१ अॅक्टिव्ह रुग्ण असून आजवर १६,३०,१११ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यासहीत देशभरात कोरोनाचा धोका कमी होत असल्याचं चित्र आहे. मात्र जगभरातील तज्ञ दुसरी लाट येऊ शकते, असा इशारा देत आहेत. अशातच संपूर्ण देशात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते. रस्त्यावर अनेक ठिकाणी गर्दीचं चित्र पाहायला मिळत होतं. ही गर्दी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी अनुकूल ठरणार की काय अशी शंका पुणे शहरातील कोरोना रुग्णांच्या नव्या आकडेवारीतून निर्माण झाली आहे.

पुण्यात आज दिवसभरात ३८४ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या २१दिवसांतील ही सर्वाधिक वाढ आहे. कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पुणे शहर हे कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं.