मोबाईल रिचार्जच्या किंमती वाढणार:नवीन वर्षात ग्राहकांना झटका
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांना नव्या वर्षात मोठा झटका मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, वोडाफोन-आयडियाआणि एयरटेल आपले टेरिफ (tariff) प्लान 10 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याच्या तयारीत आहेत. कंपन्या सध्या तोट्यात असून, त्यासाठीच टेरिफमध्ये वाढ करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. टेलिकॉम कंपन्या, नव्या टेरिफच्या वाढीची घोषणा डिसेंबरच्या अखेरीस किंवा 2021च्या सुरुवातीपासून करू शकतात.
कंपन्या 25 टक्के टेरिफ वाढवण्याबाबत आग्रही आहेत. परंतु एकाच वेळी किंमतीत इतकी मोठी वाढ शक्य नाही. त्यामुळे 10 ते 20 टक्क्यांपर्यंत टेरिफ प्लानच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.वोडाफोन, एयरटेलने गेल्या वर्षी 2019 मध्येही टेरिफच्या किंमती वाढवल्या होत्या.
वोडाफोन-आयडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर रविंदर टक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वोडाफोन-आयडियाच्या सध्या असलेल्या दरात वाढ होणार आहे. त्याशिवाय इतर प्रतिस्पर्धी टेलिकॉम कंपन्याही आपले टेरिफ प्लान वाढवू शकतात.
सध्या वोडाफोन प्रति युजर 119 रुपये, एयरटेल 162 रुपयांच्या हिशोबाने कमाई करत आहे. आता येणाऱ्या दिवसांत, येणाऱ्या नव्या वर्षात ग्राहकांना मोबाईलवर बोलण्यासाठी किती अधिक खर्च करावा लागेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.