राम मंदिर निर्माणासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील-स्वामी गोविंददेव गिरी महाराज
अयोध्येत भव्यदिव्य राम मंदिर उभारले जाणार आहे. या कामाला साडे तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. सध्या काम सुरु आहे त्या ठिकाणी २०० फूट खोदकाम करूनही खडक लागलेला नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तिथे काम केले जात आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर निर्माणासाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील असे प्रतिपादन राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली आहे.
अयोध्येत साकारत असलेल्या राम मंदिर निर्माणासाठी शिवसेनेकडून एक किलो चांदीची वीट विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्द केली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले की, “अयोध्येत होणार्या राम मंदिराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
हे मंदिर भव्य दिव्य असणार आहे. तसेच मंदिरासाठी अनेकांनी आजवर पुढे येऊन काम केले आहे. त्यात सर्वात पुढे येऊन वेळोवेळी भूमिका मांडणारे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी केलेले कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांच्या पक्षाकडून देण्यात आलेल्या चांदीच्या विटेचा आपण स्वीकार करत आहोत”.