प्रासंगिक

प्रकाश, मांगल्य आणि उत्साहाचा सण दिपावली

प्रकाश, मांगल्य आणि उत्साहाचा सण असणाऱ्या दिवाळीला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. गाय आणि वासराच्या पूजेचे महत्त्व असणारा वसुबारस हा दिवाळीच्या दिवसांमधील पहिला दिवा. पूर्वी घरोघरी गाई होत्या. मात्र, सध्या शहरांतील गायींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शहरांमध्ये अनेक ठिकाणी गाय-वासरांच्या पूजेचे आयोजन करण्यात येते.

या दिवशी अनेक जण गायीच्या दूधापासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करत नाहीत. तर सायंकाळी सवत्स गायीची पूजा केली जाते. यंदा गुरूवारी गोवत्स पूजनाने दीपावलीची सुरूवात होणार आहे. आपल्या देशातील ‘ऋषी आणि कृषी’ या संस्कृतीचा मिलाफ असणाऱ्या वसुबारसेला गाईची सवत्स पूजा करण्यात येते.
वसुबारस याचा अर्थ ‘वसु’ म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादशी.

या दिवसाला ‘गोवत्स द्वादशी’ असेदेखील म्हणतात. वर्षातील हा एक दिवस गाय आणि वासराच्या पूजेसाठी राखून ठेवला आहे. गुरूवारी सायंकाळी 5 ते 6.30 या वेळात गाय आणि वासराचे पूजन करून, त्यांची प्रार्थना करावी. यासह देवाला नैवेद्य आणि गोग्रास द्यावा.