राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या वादग्रस्त विधानावरून ब्राह्मण समाज आक्रमक
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या वादग्रस्त विधानावरून ब्राह्मण समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना एकनाथ खडसेंनी मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले असं विधान केले होते, त्यावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघाने खडसेंच्या विधानावर आक्षेप घेत त्यांनी तातडीने माफी मागावी असं म्हटलं आहे.
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका करताना ब्राह्मण समाजाबाबत जे वक्तव्य केले ते त्यांनी मागे घ्यावं, अन्यथा पुण्यात खडसेंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, त्यांच्या वक्तव्याचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत भोगावे लागतील असंही दवेंनी म्हटलं आहे.
त्याचसोबतच दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी, हे एकनाथ खडसेंना ज्ञात नाही याचे आश्चर्य वाटतं, एकनाथ खडसेंनी आपलं विधान मागे घ्यावं नाहीतर पुण्यात आल्यानंतर खडसेंना जाब विचारण्यात येईल. यासंदर्भात आनंद दवेंनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निवेदनही दिलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या वादग्रस्त विधानाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.