जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचेसह सहा जणांवर होणार गुन्हा दाखल
- परळीतील जलयुक्त शिवार योजनेतील घोळ-अँड. अजित देशमुख
बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना राबवत असताना मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार झाला. या कारभाराची चौकशी झाल्यानंतर परळी तालुक्यातील अनेक कामे झाली नसल्याचे आणि त्यात अधिकाऱ्यांनी लक्ष न ठेवता हात ओले केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जलयुक्त शिवारचे काम करणारे तत्कालीन अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. आर. एस. भताने यांच्यासह सहा जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आदेश निर्गमित झाले असल्याची माहिती जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिली आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत परळी तालुक्यातील बोगस कामांची पाहणी करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यातील दक्षता पथकाने ही पाहणी केल्यानंतर कामे न झाल्याने अनेक अधिकाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस दिली होती. यानंतर विभागीय कृषी सह संचालक, औरंगाबाद यांनी दिनांक १ ऑक्टोबर २०२० व दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी याबाबत सध्याची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना आदेश देऊन कारवाई करण्याचे कळविले होते. यानंतर श्री. राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड यांनी दिनांक ६/१०/२०२० रोजी त्याप्रमाणे दिनांक २९ आणि ३० सप्टेंबर २०२० रोजी श्री. ए. ए. सोनवणे, तालुका कृषी अधिकारी परळी, यांना याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत केले आहे. व तसे आदेश दिलेले आहे. मात्र अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. प्राप्त माहिती प्रमाणे तत्कालीन आर. एस. भताने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, व्ही. एम. मिसाळ, तत्कालीन उप विभागीय कृषी अधिकारी, अंबाजोगाई, बी. बी. बांगर तत्कालीन उप विभागीय कृषी अधिकारी, परळी, त्याच प्रमाणे कृषी सहाय्यक एस. एस. गव्हाणे, एस. एस. जायभाये आणि श्रीमती के. एन. लिमकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना चांगल्या पद्धतीने राबवली गेली नाही. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. आणि तोही परळी मध्ये. त्यामुळे योजना सफल झाली नाही. हे या सर्व चौकशीतून निष्पन्न झाले आहे. त्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर देखील अद्याप गुन्हा दाखल होत नाही, ही बाब गंभीर असून याबाबत जन आंदोलनाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचेकडे नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणात लक्ष घातले असल्याची माहिती देखील अँड. देशमुख यांनी दिली आहे