ज्यांना आमच्याशी टक्कर द्यायची खुमखुमी असेल त्यांनी अंगावर यावं आम्ही त्यांना दाखवून देऊ -पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मुंबई : ‘सरकार स्थापन व्हायला एक वर्ष होत आलं. तरीही विरोधक तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्या. मी ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून कारभाराला सुरुवात केली त्या दिवसापासून अनेकजण सरकार पडेल, असं स्वप्न बघत आहेत. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपाला चिकटणारे मुंगळे नाहीत. पण जर वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो ते दाखवल्याशिवाय राहणार नाहीत’, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केला.
शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात अगदी 50 जणांच्या उपस्थितीत पार पडत आहे. कोरोना संकटामुळे दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा यंदा खंडित होत आहे.
सरकार स्थापन झाल्यापासून मी ऐकतोय सरकार पडेल, सरकार पडेल. आजही मी म्हणतो, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सुरूवात केली.
उद्धव ठाकरेंनी यावेळी हिंदुत्वापासून विरोधकांच्या राजकारणाबद्दल सर्व गोष्टींवर भाष्य केलं आहे. मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून आज बोलणार आहे. जर एखादा शब्द इकडे-तिकडे गेला तर मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोभतं का, असं विचारलं जाईल. पण तरीही मला संयमाचं महत्त्व माहीत आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे-
मंदिरं का उघडत नाही म्हणून हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारलं जात आहे. कोण विचारतंय? ज्यावेळी बाबरी पाडली गेली, त्यावेळी आता जे हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारत आहेत. ते त्यावेळेला शेपट्या घालून कोणत्या बिळात बसले होते काय माहिती? यांना त्याकाळी घराच्या बाहेर कुणीही न ओळखणारे आम्हाला हिंदुत्वाबद्दल विचारत आहेत
महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदीचा कायदा मग गोव्यात का नाही, असं मी विचारलं होतं. हे असं तुमचं रया गेलेलं हिंदुत्व. इथं गाय म्हणजे माता आणि पलीकड जाऊन खाता
एकमेकांना नुसत्या टोप्या घालू नका. टोपी खाली डोकं असेल त्यात मेंदू असेल तर सरसंघचालक मोहन भागवत यांना हिंदुत्वाचा अर्थ विचारा. मोहन भागवत जे म्हणाले ते त्यांच्या राजकीय संघटनेनं पाळायला हवं. राजकारण म्हणजे शत्रूमधील युद्ध नव्हे. विवेक पाळा, असं भागवतांनी म्हटलं होतं.
बिहारला फुकट लस देत आहे आणि महाराष्ट्राचे 38 हजार कोटी रुपये थकवले आहेत. आम्हाला कर्ज काढायला सांगत आहे. पण, का म्हणून आम्ही कर्ज काढायला हवं?
जीएसटी पद्धत चुकली असेल तर पंतप्रधान मोदींनी प्रामाणिकपणे आपली चूक मान्य करावी. मी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी जीएसटी या करप्रणालीविषयी चर्चा करायला हवी.
रावसाहेब दानवे म्हणाले लग्न तुम्ही केलं आणि पैसे मात्र बापाकडे मागत आहेत. दानवे जी, ते तुमचे बाप असतील, माझा बाप इथं माझ्यासोबत आहे. तुमचे भाडोत्री बाप तुम्हाला लखलाभ.
मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटलं गेलं. घरी खायला येत नाही म्हणून मुंबईला यायचं आणि महाराष्ट्राची बदनामी करायची… ही अशी औलाद. ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीर, मुंबई पोलीस निकम्मे, महाराष्ट्रात सगळीकडे गांज्याची शेती आहे,’ अशी बदनामी करण्यात आली. पण, मला मुंबईला पोलिसांबद्दल अभिमान आहे. छातीवर गोळ्या झेलून अतिरेक्यांना जिवंत पकडणारे जगातील एकमेव पोलीस दल मुंबईचं आहे.
जो कुणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा प्रयत्न करेल त्याच्या देहाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही.
भाजपनं जो डाव हरियाणाच्या कुलदीप सिंग बिष्णोई यांच्याबरोबर खेळला तोच डाव आता ते बिहारमध्ये खेळत आहे. महाराष्ट्रात हाच डाव आपल्याशी खेळण्याचा प्रयत्न केला होता. बिहारमध्ये आता ते नीतीश कुमारांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत आहे, माझ्या नितीश कुमार यांना शुभेच्छा आहेत.