अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आमदार; विधानपरिषदेवर बिनविरोध निवड
मुंबई/वृत्तसेवा
अखेर उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली असून राज्य सरकारसमोरील संकट संपलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुन राज्य सरकारसमोर मोठा पेच उभा राहिला होता. पण अखेर उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासहित इतर आठ उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागणीनुसार विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. म्हणजेच मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार नाही हे राज्यपालांनी स्पष्ट संकेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या उभय सभागृहाचे सदस्य नाहीत. तसेच त्यांची २७ मेपूर्वी निवड होणे आवश्यक असल्याने नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी विनंती राज्यपालांनी निवडणूक आयोगाला केली होती.