चौथ्या लॉक डाऊन मध्ये थोडी शिथिलता मिळण्याची शक्यता
मुंबई/प्रतिनिधी
लॉकडाउन ४.० मध्ये निर्बंध शिथील करण्याबरोबरच आर्थिक घडामोडींना जास्तीत जास्त चालना देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. उत्पादन कारखाने सुरु करण्याबरोबरच देशांतर्गत मर्यादीत मार्गावर हवाई सेवा सुरु होऊ शकते. करोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या विभागणीमध्ये कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
Covid-19 पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या आधारावर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात येतो. ती पद्धत तशीच राहिल. रेड आणि ऑरेंज या वर्गवारीतील नॉन कंटेनमेंट झोनमध्ये उत्पादन कारखाने, व्यवसाय, आर्थिक व्यवहारांवरील निर्बंध मोठया प्रमाणात कमी होऊ शकतात. लॉकडाउन ४.० मध्ये कंटेनमेंट झोन बाहेरच्या आर्थिक, व्यावसायिक घडामोडींना मोठी गती मिळू शकते.सोमवारपासून दिल्ली-मुंबई या मर्यादीत मार्गावर हवाई प्रवास सुरु होणार आहे. खासकरुन लॉकडाउनमुळे दुसऱ्या राज्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी परतता यावे यासाठी विशेष विमाने सोडण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासंबंधी कोणताही निर्णय घेतलेला नाही. रेड झोनमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. हा खासगी कार्यालये सुरु होण्याच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. मेट्रोसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मर्यादीत प्रमाणात सुरु होऊ शकते. लॉकडाउन ४.० मध्ये मॉल, सलून बंदच राहतील असे सूत्रांनी सांगितले.